
कोल्हापुरात आज गोकुळ दूध संघाची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेवेळी सतेज पाटील आणि शौमिका महाडिक यांच्या गटामध्ये संघर्षाची चिन्हं आहेत. धक्काबुक्कीही या भागात झालेली पाहायला मिळाली. गोकुळ संघ दोन्ही गटांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? एकवेळ आमदारकी नसली तरी चालेल पण गोकुळ संघाचं संचालक पद हवं, अशी स्पर्धा कोल्हापुरात का सुरू असते, याविषयी जाणून घ्या...
पूर्वी दूधासाठी महाराष्ट्र गुजरातवर अवलंबून होता. मुंबईला अमूल दूध समूहाकडून दूध यायचं. ही गोष्ट आहे महाराष्ट्र निर्मितीअगोदरची. मोरारजी देसाईंच्या काळात महाराष्ट्रात दुग्धउद्योग रुजू दिला जात नव्हता. मात्र जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री पदी आले, तेव्हा त्यांनी यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना गरिबीतून बाहेर काढायचं., असं म्हणत त्यांनी मुंबईला राज्याच्या ग्रामीण भागातून दूध पुरवठा कऱण्याचा निर्धार केला.
यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकाराने स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कोल्हापुरात १९६३ साली शासकीय दुग्धालयाची उभारणी झाली. सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते एन टी सरनाईक यांनी या संघाची स्थापना केली आणि पुढे याच करवीर तालुका संघाचं जिल्हा मिल्क फेडरेशन झालं. इथंच गोकुळचा जन्म झाला. त्यानंतर आनंदराव पाटील चुयेकर यांनी सरनाईक यांना साथ दिली आणि त्यांनी संघाचं कार्यक्षेत्र वाढवलं. त्यांच्याच परिश्रमामुळे गोकुळला दुधाची शिखर संस्था म्हणून मान्यता मिळाली.
१९८१-८२ मध्ये संघात पहिली निवडणूक झाली. शिरगावमध्ये २५ एकर जागेत डेअरीही सुरू झाली. या डेअरीच्या उद्घाटनाच्या दिवशी आनंदराव चुयेकर म्हणाले की आजपासून आपल्या गावागावात गोकुळ नांदेल. तेव्हापासून कोल्हापूर दूध संघाला गोकुळ हे नाव मिळालं.
पुढे महादेवराव महाडिकांनी गोकुळच्या दूध वाहतुकीच्या कंत्राटाची मागणी केली. पण चुयेकरांनी ही मागणी फेटाळल्यानंतर संतप्त झालेल्या महाडिकांनी येनकेनप्रकारेन निवडणुकीत चुयेकरांना पराभव केला आणि सगळा व्यवहार आपल्या हातात घेतला. आजही गोकुळची सत्ता महादेवराव महाडिकांच्याच हातात आहे. आज गोकुळ महाराष्ट्रात एक नंबर आणि देशात अमूलच्या खालोखालचा ब्रँड आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.