
इचलकरंजी : प्रभाग रचनेबाबत कार्यवाही सुरूच राहणार
इचलकरंजी: इचलकरंजी पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसाठी पुढील कार्यवाही सुरूच राहणार आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेबाबत मुदतीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. त्यासाठी १० ते १४ मे अशी मुदत दिली आहे. तर दुसरीकडे इचलकरंजी महापालिका करण्याबाबत अधिसूचना जारी केली असतानाही वरील कार्यवाही सुरू राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
इचलकरंजी पालिकेची मुदत गेल्या डिसेंबरअखेर संपली आहे. तर सध्या प्रशासकांची नियुक्ती आहे. यापूर्वी रचनेबाबत कार्यवाही सुरूच राहणार निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना अंतिम करण्याबाबत कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र राज्य शासनाने केलेल्या सुधारित अधिनियमनानुसार प्रारुप प्रभाग रचनेवरील पुढील कार्यवाही स्थगित केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा प्रारुप प्रभाग रचनेवरील पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
यात राज्यातील मुदत संपलेल्या २०७ पालिकांच्या निवडणुकीसाठी सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. यात इचलकरंजी पालिकेचाही समावेश आहे. यात १० ते १४ मे या कालावधीत सूचना व हरकती दाखल करण्यास मुदत आहे. २३ मे पर्यंत सुनावणी घेणे, ३० पर्यंत राज्य निवडणूक आयुक्तांकडे अहवाल पाठविणे. ६ जून रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे असा सुधारित कार्यक्रम आहे.
इच्छुकांमध्ये गोंधळाची स्थिती
एकीकडे इचलकरंजी महापालिका करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यावर हरकती व सूचना करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर प्रकटन दिले आहे. तर दुसरीकडे प्रभाग रचनेवर पुढील कार्यवाही सुरु ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांत गोंधळाची परिस्थिती आहे. महापालिका होणार असल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम किमान सहा महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक पुन्हा निवांत झाले होते. पण निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Web Title: Ichalkaranji Proceedings Regarding Ward Formation Continue
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..