
सावकारांच्या त्रासाला कंटाळून इचलकरंजीत वेल्डरची आत्महत्या
इचलकरंजी : खासगी सावकाराच्या धमक्या आणि त्रासाने एका वेल्डिंग व्यावसायिकाने लॉजमध्ये आत्महत्या केली. निरंजन ऊर्फ नीलेश नारायण पोटे (वय ४०, रा. शांतीनगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेली आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. प्रल्हाद सुभाष नगरकर (३४, रा. शांतीनगर), अनिल बंडू तराळ (५२, रा. शहापूर) या दोघांना अटक केली.
न्यायालयाने तीन मार्चपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पोटे यांचे थोरात चौकात वेल्डिंग दुकान आहे. निरंजन यांनी प्रल्हाद नगरकर आणि अनिल तराळ यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर व्याजासहित ६० हजार रुपये परत केले. तरीदेखील पैशांसाठी दुचाकी काढून घेण्याची धमकी देत होते. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून निरंजन यांनी सोमवारी (ता. २८) शाहू कॉर्नर येथील एका लॉजमध्ये पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनास्थळावरून पोलिसांनी चिठ्ठी, दोरी आणि मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी निरंजन यांचे मोठे भाऊ संतोष पोटे यांनी फिर्याद दिली आहे. बेकायदेशीररीत्या सावकारी करून पैशांसाठी दुचाकी काढून घेण्याची धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नगरकर आणि तराळवर दाखल झाला आहे.
Web Title: Ichalkaranji Welder Commits Suicide After Being Harassed By Moneylenders
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..