
इचलकरंजीत लाकूड ओढण्याच्या शर्यतीचा थरार रंगणार
इचलकरंजी - इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्यावतीने कर्नाटक बेंदूर सणानिमित्त सालाबादप्रमाणे शतकोत्तर परंपरा असलेल्या ऐतिहासिक लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे 11 व व 12 जून रोजी डीकेटीई नारायण मळा येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली. दरम्यान, शर्यतीसाठी मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे व मान्यवरांनी मैदान व तयारीची पाहणी केली.
इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांनी सुरु केलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती कोरोनाचा काळ वगळता अखंडीतपणे सुरु आहेत. इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्यावतीने दरवर्षी या शर्यती घेतल्या जात आहेत. यंदाही कर्नाटक बेंदुर निमित्त लाकूड ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. लहान गट व मोठा गट अशा दोन गटात ही शर्यत होत आहे. त्याचबरोबर सुट्टा बिनदाती बैल पळविण्याची स्पर्धा होणार आहे.
दरम्यान, संयोजकांनी शर्यतीची जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार आज मैदानाची पाहणी करण्यात आली. यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधासभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नंदु पाटील, शांतिनाथ मगदूम, बाबासो पाटील, मनु हिराणी, संपत जामदार, शिवाजी माळी, राजेंद्र बचाटे, राहुल घाट, नरसिंह पारीक, बंडू जोंग, पप्पु पाटील, सागर कम्मे, गजानन अब्दागिरे, राजू माळी, राजू दरीबे, रमेश पाटील, फरीद मुजावर, रेवननाथ कदम आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी बक्षीसे अशी..
लहान गटात पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे 75 हजार रुपये, शिल्ड व चांदीची फिरती गदा, 51 हजार व 31 हजार अशी बक्षिसे देण्यात येतील. मोठ्या गटात प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, शिल्ड व चांदीची फिरती गदा, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार व तृतीय क्रमांकासाठी 51 हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. तर सुट्टा बिनदाती बैल पळविणे स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास 15 हजार, द्वितीय क्रमांकास 11 हजार व तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.
जनावर प्रदर्शनासह कर तोडण्याचा कार्यक्रम
श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौक येथे 14 जून रोजी भव्य जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 15 रोजी दुपारी 4 वाजता शाहीर संजय जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आणि सायंकाळी 5 वाजता कर तोडणे व स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
Web Title: Ichalkaranji Will Have Thrilling Wood Pulling Race
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..