esakal | चिनी ॲपला बंदी मात्र भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात या अडचणी

बोलून बातमी शोधा

Indian government ban on Chinese apps impact for indian students online education difficult

भारतीय विद्यार्थ्यांना बसतोय फटका; शैक्षणिक वाटचाल होतेय खडतर

चिनी ॲपला बंदी मात्र भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात या अडचणी
sakal_logo
By
आकाश खांडके

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधील वुहान शहरात सुरू झाला. ही बातमी झपाट्याने सर्वत्र पसरली. त्या वेळेस काही भारतीय विद्यार्थी वुहानमधील विद्यापीठात उच्च शिक्षण घेत होते. चीनमध्ये नवीन वर्षाच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. त्यामुळे विद्यार्थी मायदेशी परतले. त्यानंतर काही दिवसांत भारतात लॉकडाऊन जाहीर झाला. जानेवारीमध्ये परतलेले विद्यार्थी सप्टेंबर उजाडला तरी इथेच आहेत. भारत सरकारने चिनी ॲपवर बंदी घातल्याने ऑनलाईन शिक्षणाचा त्यांचा मार्ग खडतर झाला आहे. त्याचा फटका भारतात परतलेल्या सम्मेद पाटील व कुलदीप चव्हाणला बसत आहे.


हातकणंगलेचा सम्मेद २०१९ पासून वुहानमध्ये उच्च शिक्षणासाठी स्थायिक होता. दोन तीन दिवस आधी तो हिवाळी सुट्टीच्या निमित्ताने मायदेशी परतला. तो सांगतो, ‘‘जानेवारीतील कडाक्‍याची थंडी माझ्यासाठी नवी होती. या वातावरणात काही दिवसांत सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. लक्षणे न्यूमोनियासारखी असल्याने या आजाराची साथ आल्याच्या चर्चेने जोर धरला. स्थानिक पातळीवर कार्यरत यंत्रणेने नागरिकांना दवाखान्यात उपचार घेण्यास प्रोत्साहित केले.

हेही वाचा- Video : अहो, घ्या की पेरू घ्या, फोड खाऊन तर बघा ; पेरु खाताय मग ही बातमी वाचाच 

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वसतिगृहावरच राहण्याच्या सूचना दिल्या. दिवसागणिक परिस्थिती खालावत गेली. माझे हिवाळी सुट्टीत भारतात परतण्याचे पूर्वनियोजन होते. त्यानुसार १७ जानेवारीला तिथून निघालो. काही दिवसांतच वुहान लॉकडाऊन झाले. सुट्टी संपल्यावर परतण्याचा विचार होता पण भारतात कोरोना पसरला व लॉकडाऊन जाहीर झाले. परत जाणे शक्‍य नव्हते. या भयानक परिस्थितीत मी घरी आहे याचे समाधान वाटते.’’


कुलदीपने पाच-सहा महिने वुहानमध्ये वास्तव्य केले. जानेवारीत असणाऱ्या हिवाळी सुट्टीसाठी तो भारतात परतला. कोरोना प्रादुर्भावामुळे परत जाण्याचे मार्ग बंद झाले. सुरवातीला ऑनलाइन अभ्यास सुरू होता. चिनी ॲप बंद झाल्याने त्याचे ऑनलाइन शिक्षण थांबले. विद्यापीठाबरोबर थेट संपर्क होत नसल्याचे तो म्हणाला. 

हेही वाचा-कोल्हापुरातील 9292 नंबरची क्रेझ अन्‌ साहेबप्रेमी


तो म्हणतो, ‘‘चीनमध्ये लॉकडाऊन पुकारला गेला. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. परिस्थिती आटोक्‍यात आल्यावर ऑनलाईन क्‍लास सुरू झाले. चिनी ॲपवरील बंदीने ऑनलाईन क्‍लासला खीळ बसली आहे. सध्या विद्यापीठाबरोबर संपर्क साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मित्रांची मदत घ्यावी लागत आहे. शिक्षण परत कधी सुरू होणार, हा प्रश्न पडलाय.’’

संपादन -  अर्चना बनगे