कोल्हापुरात साकारणार इनडोअर स्टेडियम : सतेज पाटील

१० कोटी मंजूर, मे अखेरपर्यंत आराखडा करणार
satej patil
satej patilSakal

कोल्हापूर - ‘शहरात पहिले इनडोअर स्टेडियम उभारण्यात येणार असून, त्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी आयटी पार्कशेजारील तसेच शेंडा पार्क येथील जागेचा विचार सुरू असून मे अखेरपर्यंत आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचा दुसरा टप्पाही राबवण्यात येणार आहे,’ अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्री पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या स्टेडियममुळे फुटबॉल व क्रिकेट सोडल्यास इतर खेळाडूंना सराव करण्यासाठी स्टेडियमचा उपयोग होणार आहे. पाच ते सहा एकरात केल्या जाणाऱ्या स्टेडियमचा आकार पहिल्या टप्प्यात अर्धगोलाप्रमाणे ठेवण्यात येईल. भविष्यात दुसऱ्या टप्प्यात आणखी निधी मंजूर झाल्यानंतर पुढील अर्धगोल पूर्ण केला जाईल. त्यादृष्टीने आराखडा बनवण्यात येणार आहे. त्यातून ॲथलेटिक ट्रॅकही साकारता येऊ शकेल. या सुविधेतून खेळाडूंना अधिकची जागा मिळणार आहे.

ते म्हणाले, ‘‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. यासाठी नगरविकास विभागाकडे मी पाठपुरावा केला होता. पहिल्या टप्प्यात महापालिकेला उत्कृष्ट आर्किटेक्टद्वारा आराखडा बनवायला सांगितले आहे. मे अखेरपर्यंत तो पूर्ण झाल्यास त्यास मंजुरी घेऊन सप्टेंबरच्या दरम्यान कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी आमदार जयश्री जाधव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

शाहू समाधिस्थळासाठी आठ कोटींच्या निधीला मंजुरी

महापालिकेतर्फे साकारण्यात येत असलेल्या शाहू समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या आठ कोटींच्या निधीबाबत तांत्रिक मंजुरी झाली आहे. त्यामुळे याचा प्रस्ताव समाजकल्याणमार्फत मुंबईच्या कार्यालयाकडे पाठवला जाईल, त्यानंतर निधी उपलब्ध होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. शाहू मिलच्या आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामाचा अंदाजित खर्च अजून काढलेला नाही. इमारती तयार असून त्याचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे ४०० कोटींपर्यंत खर्च येणार नाही, असेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com