esakal | जिल्ह्यातील कारखाने, उद्योगांचा ऑक्‍सिजन रुग्णांसाठी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बोलून बातमी शोधा

null
जिल्ह्यातील कारखाने, उद्योगांचा ऑक्‍सिजन रुग्णांसाठी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. साखर कारखाने व इतर उद्योगांतील ऑक्‍सिजन सिलिंडर बाधितांच्या उपचारासाठी वापरण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. साखर कारखाने व इतर उद्योग, कारखान्यांत असलेल्या ऑक्‍सिजनचा तपशील शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व आरोग्य अधिकाऱ्यांकडे द्यावा. त्यानंतर मागणीनूसार सिलिंडर कोरोना रुग्णांना दिला जावा. ऑक्‍सिजन सिलिंडर घेताना व आरोग्य यंत्रणेला देताना त्यांच्या स्वतंत्र नोंदवह्या ठेवाव्यात. आवश्‍यक तपशिल नमूद करण्याचे आदेश दिले.

शासकीय, खासगी रुग्णालयात, कोव्हिड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होत आहेत. वैद्यकीय ऑक्‍सिजनची गरज अनेक पटीने वाढण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍सिजन कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारावर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थांना आज जिल्हाधिकारी देसाई यांनी पत्र पाठविले आहे.

हेही वाचा: जिल्हाबंदी लागू, रस्ते सील; कोल्हापुरकर विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही

ऑक्‍सिजन टॅंकचे ऑडिट करा

खासगी व शासकीय रुग्णालयात ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी उभारलेला टॅंक व सिलिंडरद्वारे ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. श्री. देसाई यांनी आज राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, आयजीएम, पायोस हॉस्पिटल, ॲपल सरस्वती, ॲस्टर आधार, अथायू, डायमंड, डॉ. डी.वाय. पाटील, सिद्धगिरी हॉस्पिटलला पत्र पाठविले असल्याचेही सांगितले.

राज्याचे आदेशच लागू

लग्न समारंभ दोन तासांतच उरकावा लागेल. विवाह समारंभात पंचवीसपेक्षा जास्त लोक असतील तर त्या कुटुंबाला ५० हजारां दंड करावा. जिल्हांतर्गत आणि शहरांतर्गत बस सेवा सुरू राहील. राज्य शासनाने ज्याप्रमाणे आदेश लागू केले आहेत, तेच आदेश जिल्हा प्रशासनाने आज लागू केले आहेत.