esakal | जिल्हाबंदी लागू, रस्ते सील; कोल्हापुरकर विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही

बोलून बातमी शोधा

null

जिल्हाबंदी लागू, रस्ते सील; कोल्हापुरकर विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने रात्रीपासून जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे शहरातील किंवा तालुक्‍याच्या ठिकाणच्या व्यक्तीला अत्यावश्‍यक कारण असल्याखेरीज शहर किंवा गावाबाहेर जाता येणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. मृत्यू, तातडीची वैद्यकीय गरज आणि अत्यावश्‍यक सेवा या घटकांना जिल्हा बंदीतून वगळण्यात आले आहे. मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना यातून वगळले आहे. नियमभंग करणाऱ्यांना दंड होईल किंवा गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे श्री. बलकवडे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री आठपासून शहरासह जिल्ह्यात संचारबंदी अधिक कडक करण्यात आली. शहरात नऊ, इचलकरंजीत सहा, तर तालुकास्थळी प्रत्येकी दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. येथे कर्मचाऱ्यांबरोबर एका अधिकाऱ्याची नेमणूक केली असून, मोबाईल गस्तीपथकात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात असून, आंतरजिल्हा वाहतूक रोखण्यासाठी किणी, कोगनोळी, अंकली, रत्नागिरी मार्गावरील आंबा, चंदगड येथील शिनोळी, राधानगरी रोड, गगनबावडा मार्गावरील गवसे अशा सात ठिकाणी नाकाबंदी आहे. रस्त्यावरून फिरणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.'

हेही वाचा: हेल्दी टेस्टी पदार्थ खायचा असेल तर घरीच बनवा आंबट गोड कारल्याची भाजी; सोपी रेसिपी

शासनाने ४ एप्रिलपासून निर्बंध लागू केले. सुरवातीला पोलिस प्रशासनाने आवाहन केले. स्थिती गंभीर होत असल्याने मंगळवार (१३)पासून निर्बंध कडक करण्यात आले. तशी पोलिसांनी कारवाई सुरू केली; पण अत्यावश्‍यक सेवेचे कारण सांगून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. निर्बंधाचे पालन करण्यासाठी आता शहर, तालुक्‍यासह जिल्हाबंदी केली आहे. असे बलकवडे यांनी सांगितले. यात वैद्यकीय उपचार, मृत किंवा अंत्यविधीचे कारण आणि अत्यावश्‍यक सेवांशी निगडितांना यातून वगळले आहे. शेतीकामासाठी जाणाऱ्यांना आणि मालवाहतूक वाहनांना त्रास दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांचे पत्ते तपासणार

घराजवळ भाजी मार्केट उपलब्ध असताना विनाकारण फिरत दूर भाजी खरेदीसाठी जाणाऱ्यांना लगाम घालू. प्रत्येक भाजी मार्केटमध्ये बंदोबस्त तैनात आहे. त्यांच्याकडून खरेदीसाठी येणाऱ्यांचे पत्ते विचारले जातील. दूरवर फिरत येणाऱ्यांची वाहने जप्त करून थेट गुन्हे दाखल करणार आहे. याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करून सहकार्य करावे, असे बलकवडे यांनी सांगितले.

अँटिजेन टेस्टचीही मदत

अनावश्‍यक वाहतूक रोखण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. यात बाधितांना थेट क्वारंटाईन करण्यात येईल.

इव्हिनिंग वॉकर्सवरही करडी नजर

मॉर्निंग वॉकर्सवर कारवाईची मोहीम सुरूच आहे; पण पोलिसांची नजर चुकवून सायंकाळी व रात्री उशिरा फिरणाऱ्यांची संख्या शहरासह उपनगरात वाढली आहे. अशांवर भरारी पथकाद्वारे कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल.

कंटेन्मेंट झोनसह लसकेंद्रावर बंदोबस्त

जिल्ह्यातील प्रत्येक कंटेन्मेंट झोनसह कोरोना प्रतिबंधक लस केंद्रावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिस बंदोबस्त दिला जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

हेही वाचा: हृदयद्रावक! जीवनयात्रा एकत्रच संपली, पत्नीवर अंत्यसंस्कार सुरु असताना पतीचा मृत्यू

हुंदडणाऱ्यांवर थेट गुन्हे

कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्‍याचा विचार करून आता शहरासह जिल्हाबंदी केली आहे. अत्यावश्‍यक कारण असणाऱ्यांनाच यातून मुभा दिली जाईल. भाजी, औषधांच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही. त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू. कारवाईसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, नाकाबंदीसह गस्तीपथकात वाढ केल्याचेही श्री. बलकवडे यांनी सांगितले.

"रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईसंबंधी घेतलेल्या निर्णयाबरोबर पोलिस अधीक्षक म्हणून मी त्यांच्याबरोबर असेन. "

- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक