तीन पाटलांची प्रतिष्ठा पणाला; आघाडीतील बिघाडी कोणाच्या पथ्यावर

informative news Elections declared for five graduate and teacher constituencies in the state
informative news Elections declared for five graduate and teacher constituencies in the state

कोल्हापूर: शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी होऊ नये म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ देत ‘पदवीधर’मधून श्रीमंत कोकाटे यांनी तर शिक्षक मतदारसंघातून शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकवले. पदवीधरच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली असताना या वेळी झालेल्या बंडखोरीचा कोणाला फायदा होणार याविषयी उत्सुकता आहे.
 

दरम्यान, भाजप नेतृत्त्वावर नाराज असलेले माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडूनही पदवीधरच्या निवडणुकीत बंडखोरीची शक्‍यता असून त्यांच्याकडून पन्हाळा तालुक्‍यातील प्रा. नाथाजी चौगले यांची उमेदवारी निश्‍चित आहे. श्री. चौगले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने ते रिंगणात राहतील. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होईल.


राज्यातील पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होत आहे. ही निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यानुसार जागा वाटपही झाले आहे. पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीला तर शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. काँग्रेसने शिक्षक मतदारसंघासाठीच्या मुलाखती ४ नोव्हेंबरला कोल्हापुरात घेतल्या, त्यात दादासाहेब लाड, रेखा दिनकर पाटील, भरत रसाळे व प्रा. जयंत आसगांवकर यांनी मुलाखती दिल्या होत्या; पण काँग्रेस नेतृत्त्वाने प्रा. आसगांवर यांच्या पारड्यात उमेदवारी टाकल्याने नाराज असलेले श्री. लाड यांच्यासह सौ. पाटील याही रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.


पदवीधरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने डावलल्याने बंडखोरी करत रिंगणात उतरलेल्या अरुण लाड यांना या वेळी पक्षाने उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत श्री. लाड यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीचे सारंग पाटील अवघ्या २२०० मतांनी पराभूत झाले. या वेळी श्री. लाड यांच्यासह श्रीमंत कोकाटे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीच प्रबळ दावेदार होते; पण पक्षाने श्री. लाड यांना उमेदवारी देत गेल्या निवडणुकीतील चूक दुरुस्त केली असली तरी त्यामुळे नाराज असलेल्या श्री. कोकाटे यांनी बंडखोरी पुकारत रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. कोकाटे यांची उमेदवारी ही राष्ट्रवादीसमोरचेच आव्हान असेल. या दोघांच्या मतविभागणीचा फायदा पुन्हा भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो. 

भय्या माने यांची माघार शक्‍य
राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा घोळ वाढत चालल्याने ऐनवेळी कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे संचालक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्ट्रर समर्थक भय्या माने यांनी शड्डू ठोकला. त्यांनी काल अर्जही भरला आणि आज राष्ट्रवादीने श्री. लाड यांची उमेदवारी जाहीर केली. आता पक्षानेच उमेदवारी नाकारल्याने श्री. माने माघार घेण्याची शक्‍यता आहे. 


तीन पाटलांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पदवीधरचे दोन्हीही प्रमुख उमेदवार सांगलीचे असल्याने चुरस नक्की आहे तर काँग्रेसला जागा दिल्यास ती निवडून आणण्याचा ‘शब्द’ पालकमंत्री पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे या तिन्हीही पाटलांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com