
international women day : मातृत्वाची जबाबदारी अन् देशसेवेचे व्रतही
कोल्हापूर : मातृत्वाची जबाबदारी मोठी आणि देशसेवेचे कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे. यापैकी एकाची निवड करायची हे एक आव्हानच. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत असणाऱ्या वर्षा रमेश मगदूम-पाटील यांनी मात्र देशसेवेची निवड केली आहे. दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील पाटील यांनी दहा महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिला. प्रसूती व बालसंगोपन रजा संपल्यानंतर त्या मंगळवार (ता. १४) पासून देशसेवेसाठी बॉर्डरवर जॉईन होणार आहेत. त्यांच्यातील आईची मात्र यावेळी घालमेल राहणार आहे.
वर्षा यांचे माहेर नंदगाव. २०१४ मध्ये त्या सीमा सुरक्षा बलमध्ये भरती झाल्या. खडतर प्रशिक्षणाचा कालावधी संपवून त्या गुजरातच्या भूज सीमेवर जॉईन झाल्या. सहा महिने सीमेवर तैनात आणि सहा महिने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या परेडची तयारी असे त्यांच्या सेवेचे वेळापत्रक.
दरम्यान, २०१९ मध्ये बँकेत नोकरीस असलेल्या रमेश मगदूम यांच्याशी त्यांचा विवाह झाला. २०२१ मध्ये त्यांना मातृत्वाची चाहूल लागली. त्याचवेळी त्यांनी देशसेवा सोडायची नाही, होणाऱ्या बाळावरही देशसेवेच्या संस्काराची बिजे रुजली पाहिजेत, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. २०२२ मध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नावही त्यांनी ‘दक्ष’ ठेवले.
मुलाच्या जन्मानंतर त्या मातृत्वाच्या सुखाने आनंदून गेल्या. मात्र, त्याचवेळी देशसेवेसाठी बाळापासून दूर राहावे लागणार, ही भावनाही दाटली. त्यामुळे प्रसूती व बालसंगोपन रजेतून मिळालेले सर्व क्षण त्यांनी मनापासून जगले. दक्षच्या बाललीलांमध्ये त्या हरवल्या. आता रजा संपून त्यांना पुन्हा देश कर्तव्यासाठी दाखल व्हावे लागणार आहे. सध्या त्यांची पोस्टिंग राजस्थानमधील बाडमेर येथे असेल.
जॉईन झाल्यानंतर बाळ तुमच्याशिवाय राहील का ? या प्रश्नानंतर पाटील यांना गलबलून आले. बाळाची काळजी मनात नेहमीच असेल, मात्र तो माझ्याशिवाय राहील, यासाठी मी पूर्वतयारी केली आहे. त्याला वरचे खाऊ देण्यासोबतच माझी आठवण येणार नाही, यासाठी आई व सासू या दोघींनीही ‘दक्ष’ची ‘आई’ होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या विश्वासावरच मी पुन्हा जॉईन होणार, अशी भावना वर्षा पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.