
जयसिंगपूर : निर्यातबंदीचा निर्णय उद्योगाला खड्ड्यात घालणारा ; राजू शेट्टी
जयसिंगपूर: केंद्र सरकार १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. असा निर्णय झाला तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्ड्यात घालणारा असेल, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्याचा फटका गहू उत्पादकांना बसला आहे. आज कांदा १ रुपया प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जात आहे. त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात अद्यापही हजारो एकरांतील ऊस गाळपाविना पडून आहे. ऊस गाळपास जात नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षीची ८५ लाख टन साखर शिल्लक होती. यंदा ३५५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. ४४० लाख टन साखरेपैकी २८० लाख टन साखर देशाला लागते. ८० लाख टन निर्यात झालेली आहे. देशात या क्षणाला ८० लाख टन साखर शिल्लक आहे.’’
ते म्हणाले, ‘‘पुढच्या वर्षीदेखील साखरेचे विक्रमी उत्पादन होणार आहे. ११० लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. निर्यात न झाल्यास शिल्लक साखरेचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. पुढील वर्षीच्या निर्यातीचे आंतरराष्ट्रीय बाजारात करार न झाल्यास गंभीर परिणाम होतील. म्हणून केंद्र सरकारचा हा निर्णय उद्योगाला खड्ड्यात घालणारा आहे. केंद्राने निर्यातीचे धोरण राबवावे; अन्यथा उद्योग खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही.’’
Web Title: Jaisingpur Export Ban Decision Puts Industry Raju Shetti
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..