
कोल्हापूर - नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा असून त्यामुळे देशाची अखंडता धोक्यात येणार आहे. एकूणच देशाची स्थिती पहाता आता देश एका नव्या स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी आपले योगदान देणे गरजेचे असून विशेषतः युवा पिढीने सक्रिय पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ कवी, विचारवंत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कामगार नेते, विचारवंत गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित गोविंद पानसरे स्मृती जागर सभेत ते बोलत होते.
दरम्यान, राजर्षी शाहू स्मारक भवनात हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने ही सभा झाली. सभेत ‘सीएए-एनआरसी म्हणजे काय?’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. जगाला समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या स्मृतींना अभिवादन करून जावेद अख्तर यांनी सुमारे चाळीस मिनिटे संवाद साधला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंतच्या विविध राजकीय, सामाजिक स्थित्यंतरावर भाष्य करत त्यांनी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, ‘‘सध्याची स्थिती देश अनुभवत असला तरी त्याची सारी बीजं मुिस्लम लीग, हिंदू महासभा आणि त्यानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उिद्दष्टांमध्ये आहेत. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच राजकीय विभाग आहे. मात्र, स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी कधीही ब्रििटशांविरोधात भूमिका घेतल्याचे दिसत नाही.
सहा वर्षापूर्वी २०१४ ला देशात एकशे नऊ अरबपती होते आणि २०१९ मध्ये ही संख्या एकशे ३६ इतकी झाली आहे. दुसरीकडे दोन वेळचं खायला मिळणाऱ्यांची संख्या मात्र अजूनही वाढतेच आहे. २००४ साली देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या तीन ते चार क्रमांकात गणली जायची. मात्र, ती आता तीस ते चाळीस क्रमांकावर गेली आहे. बेरोजगारी वाढते आहे. कंपन्या बंद पडत आहेत. मात्र, तरीही त्याकडे कानाडोळा करत नागरिकत्व दुरूस्ती कायदा पुढे आणला जातो. हा केवळ आपला राजकीय अजेंडा पूर्ण करायचा आणि देशाचा चेहराच बदलून टाकण्याचा डाव आहे. मात्र, हा डाव देशातील सामान्य जनता उलथवून लावेल, असेही श्री. अख्तर म्हणाले.
महात्मा गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. तुषार गांधी म्हणाले, ‘‘देशाचा आत्माच बदलण्याचा आणि त्यासाठी मनमानीचा प्रयत्न सध्या सुरू आहे. नवीन भारत घडवण्याची भाषा बोलताना विविध कायदे लादले जावू लागले आहेत. दुसरीकडे गोविंद पानसरे यांच्यासारख्या विचारवंताची हत्या होवूनही पाच वर्षे हल्लेखोर मोकाट आहेत. मात्र, या साऱ्या पार्श्वभूमीवर आपण गप्प बसलो तर देशातील अराजकतेला दिलेली ती मान्यताच ठरेल. सरकारला आपण वेळोवेळी विविध माध्यमातून जाब विचारलाच पाहिजे. सरकार लादेल ते स्वीकारायचे ही मानसिक गुलामगिरीची बेडी तोडून टाकली पाहिजे.’’
सरकारमधील मंत्रीच गद्दारांना गोळ्या घालण्याचे थेटपणे बोलतो आणि तरूणाईची माथी भडकवतो. पोलिसांच्या समोर गोळ्या झाडल्या जातात, हे चित्र अराजकता निर्माण करणारे आहे आणि त्याविरोधात लढाई आणखी तीव्र केली पाहिजे. महात्मा गांधी केवळ एकटेच लढले नाहीत. त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात सामावून घेतले आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. आता नव्या स्वातंत्र्यासाठी अशाच क्रांतीची पुन्हा गरज असल्याचेही डॉ. गांधी म्हणाले.
दरम्यान, श्रमिक प्रतिष्ठानच्या डॉ. मेघा पानसरे यांनी स्वागत केले. एस. बी. पाटील यांनी आभार मानले. व्यासपीठावर उमा पानसरे, दिलीप पवार, डॉ. हमीद दाभोलकर आदी उपस्थित होते. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले.
चायवाले की दुकान...
सभा सुरू होण्यापूर्वी ‘चायवाले की दुकान’ हा दीर्घांक सादर झाला. श्री. अख्तर यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या काही रचना ऐकवण्याची विनंती झाली. त्यांनी ‘नया हुकुमनामा’ आणि ‘अंधेरे का समंदर’ या रचना सादर केल्या.
१२ मार्चपासून दांडी यात्रा
महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांविरोधात १२ मार्च १९३० ला दांडी यात्रा काढली होती. या ऐतिहासिक घटनेला १२ मार्चला नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर साबरमती ते दांडी अशी यात्रा काढणार असून त्यामाध्यमातून संविधानाचा जागर केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी सरकारची परवानगी घेतली का? असा प्रश्न विचारला गेला. मला माझ्याच देशातील रस्त्यावरून चालत जायला कशाला लागते कुणाची परवानगी ? असा प्रतिप्रश्न मी केला. भले तुरूंगात जावे लागले तरी चालेल. पण, १२ मार्चला ही यात्रा निघणारच, असे यावेळी डॉ. तुषार गांधी यांनी सांगितले.
वारिस पठाणचे वक्तव्य बालिशपणाचे
वारिस पठाणचे वक्तव्य बालिशपणाचे आणि देशाच्या एकतेला बाधा पोचवणारे असल्याचेही जावेद अख्तर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पंधरा कोटी मुस्लीमांचा ठेका हा फक्त ‘एमआयएम’कडे नाही. जे राजकारण जिनानी मुस्लीम लीगच्या माध्यमातून केले तेच राजकारण सध्या ‘एमआयएम’ करत आहे. मुस्लीम समाजाला गृहित धरण्याचे काम त्यांनी करू नये.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.