esakal | यंदाही जोतिबा चैत्र यात्रेची पूर्वसंध्या शांततेची; भाविकांविना डोंगर सुनाच

बोलून बातमी शोधा

यंदाही जोतिबा चैत्र यात्रेची पूर्वसंध्या शांततेची; भाविकांविना डोंगर सुनाच
यंदाही जोतिबा चैत्र यात्रेची पूर्वसंध्या शांततेची; भाविकांविना डोंगर सुनाच
sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : २३ जोतिबाची चैत्र यात्रा येत्या सोमवारी (२६ ) येऊन ठेपली आहे. या यात्रेच्या पूर्वसंध्येला यंदाही जोतिबाचा डोंगरावर शांतता दिसत आहे. हलगी, पिपाणी, ढोल, ताशे, सनई यांचा गजर नाही.. चांगभलचा जयघोष नाही... गुलालाची उधळण नाही... भाविकांची गर्दी नाही. यंदा ही कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भाविकांना जोतिबावर येण्यास बंदी असल्याने डोंगरा सुनासुना दिसत आहे.

एरव्ही रोज जोतिबा डोंगरावर हजारोच्या संख्येने भाविक असतात. डोंगरावर दाखल झाले की बसस्थानक ते मुख्य मंदिरापर्यंत सर्वत्र दवणा घ्याव दवणा.. अहो..पाहुण..! आपल्या मुलाबाळांना लस्सी घ्या लस्सी.. गुलाल खोबरे घ्या.. गरमा गरम बासुंदी चहा घ्या.. या आरोळ्या सतत कानी पडायच्या. मंदिर परिसरात तर हिरव्यागार काकड्या डोंगरची काळी मैना, (करवंदे, जांभूळ, आंबा) हा रानमेवा घेण्यासाठी भाविकांची लगबग दिसायची. पूर्ण डोंगर भाविकांनी गजबजून जायचा .

पण गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जोतिबा डोंगरचे हे चित्र बदलले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे. भाविकांनाही मुखदर्शन आणि कळस दर्शन, शिखर दर्शन घेऊनच परतावे लागत आहे. गेल्या पंधरा वीस दिवसापासून मात्र भाविकांना डोंगराव येण्यास बंदी आहे. भाविकांनीही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करत डोंगरावर येण्याचे टाळले आहे. आपल्या गावातूनच दख्खनचा राजाचे नमन, पुजा केली आहे.

हेही वाचा: कौतुकास्पद! 11 दिवसांच्या चिमुकलीची आई कोरोनाबाधित; मैत्रिणीने दिली मायेची ऊब

यंदा मानाच्या ९६ सासन काठ्या ज्या त्या गावात उभ्या केल्या आहेत. डोंगरावर येण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने चैत्र यात्रेचा विधी त्यांनी गावातील मंदिरात किंवा गावाच्या वेशीवर करावा लागणार आहे. जोतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस सोमवार असून डोंगरावर ग्रामस्थांशिवाय कुणीही उपस्थित नाही. जोतिबा यात्रेतील भाविकांच्या उत्सुकतेचा पालखी सोहळा केवळ २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. रविवार ते मंगळवारपर्यंत डोंगरावर पूर्णपणे संचारबंदी आहे. त्यामुळे यंदाही भाविकांना यात्रेपासून अलिप्त राहावे लागणार आहे .

"जोतिबा मंदिरात अनेक वर्षापासून बंदोबस्ताचे काम करत आहे. इतरवेळी डोंगरावर गर्दी असायची की दर्शन रांग कधी संपते याचा विचार करायचो. रात्री उशिरापर्यंत भाविक येत राहायचे. पण सध्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पूर्ण डोंगरच शांत आहे. मंदिर परिसरात केवळ पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. डोंगरावर शांतता असल्याने वेळ जात नाही."

- मनोज कदम, साहाय्यक फौजदार, कोडोली पोलीस ठाणे