esakal | स्वातंत्र्य सैनिकांच्या गावाला मिळाला सासनकाठीचा पाचवा मान

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्य सैनिकांच्या गावाला मिळाला सासनकाठीचा पाचवा मान
स्वातंत्र्य सैनिकांच्या गावाला मिळाला सासनकाठीचा पाचवा मान
sakal_logo
By
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे कागल तालुक्यातील कसबा सांगाव हे होय. गांव दुधगंगा नदी काठी वसले असून उस पिकांमुळे गांव सधन व सुखी समध्दी आहे.

जोतिबा चैत्र यात्रेस सहभागी होणाऱ्या पाचवा क्रमांकाची ची सासनकाठी आहे ती या गावातील भिमबहाद्दर माने सरकार यांची. या सासन काठीची उंची ४५ फूट असून ती विविध रंगाची असते. या काठीचे पूर्वीचे मानकरी कै. केदारराव उर्फ लालासाहेब यशवंतराव माने हे असून त्यांचे चिरंजीव शंकरराव माने धैयशील माने यांनी काठीची परंपरा सांभाळली. सध्या यांचे नातू यशवंतराव माने ,धनाजीराव माने अभिजीत माने यांनी काठीची ही परंपरा पुढे यशस्वीरित्या सांभाळली आहे.

जोतिबा डोंगरावर मंदिर परिसरात भिमबहाद्दर माने सरकार यांनी पूर्वी एक ओवर बांधून दिल्याचा उल्लेख माने यांच्याकडे असणाऱ्या दप्तरी आहे.गुढीपाडवा दिवशी ही सासनकाठी महादेव बसवेश्वर मंदिरातून माने वाड्यात वाजत गाजत आणली जाते. तेथे स्वच्छ धुवून तिला पोशाख चढविला जातो. त्यानंतर वाडयात असणाऱ्या श्री जोतिबा मूर्तीस अभिषेक घालून आरती केली जाते. या वेळी जोतिबाच्या नावानं चांगभलं होतो. त्यानंतर ती मानेवाड यातील चौकात उभी केली जाते. यावेळी जोतिबा यात्रेसाठी जाण्याचे नियोजन केले जाते.

या सासनकाठीचे वैशिष्ट्ये असे आहे की तिला दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचा पोषाख केला जातो. भाविक लोक आपल्या आवडीनुसार हा पोषाख काठीला अर्पण करतात. आता पर्यंत लाल गुलाबी केसरी अशा रंगाचे पोशाख झाले आहेत . गावातील बाळू सनदी (ट्रेलर ) हे काठीचा पोशाख मोफत शिवून देतात. गेल्या वीस वर्षापासून ते देवाची सेवा म्हणून हे काम करतात. श्री सनदी यांच्या दुकानात पासूनच हा पोषाख हलगी ताशा या वाद्याच्या गजरात मानेवाडया पर्यंत आणला जातो.

जोतिबा चैत्र यात्रेच्या दोन दिवस आधी ही सासनकाठी गावातून बाहेर पडते. काठी सोबत पूर्णपणे शंभर लोक असतात . अनवाणी पायाने काठी गावातून जोतिबा डोंगरा पर्यंत आणली जाते. यावेळी येता जाता काठीचे भव्य असे स्वागत होते. यात्रेच्या आदल्या दिवशी सांयकाळी काठी डोंगरावर येते तेथे त्यांना देवस्थान समितीच्या वतीने मानाचा विडा दिला जातो. काठी मुख्य यात्रेच्या दिवशी सायंकाळी कसबा सांगाव कडे मार्गस्थ होते. गावातील वेशीवर आल्यावर ही स्वागत होते. तिसऱ्या दिवशी सांगाव मध्ये महाप्रसाद होतो. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून ही काठी डोंगरावर गेली नाही. सर्व विधी गावातच करावे लागले आहेत. या गावातील जोतिबा भाविकांचे श्री चरणी एक साकडे आहे की कोरोना नावाचा रोग कायमचा हद्दपार होऊ दे. सर्वांना सुखाने जगू दे...

आमची पाचव्या क्रमांकाची सासनकाठी असून आमच्या पूर्वजापासून आलेली ही परंपरा आम्ही जोपासली आहे. मनोभावे अशी काठीची सेवा करतो. त्यात आम्हाला मोठा आनंद आहे.यंदा कोरोनामुळे गावात साध्या पद्धतीने सर्व धार्मीक विधी करणार असून सर्व अटी नियमांचे पालन करणार आहे .

धनाजीराव माने, सासनकाठी चे मानकरी, कसबा सागांव ता. कागल जि. कोल्हापूर

Edited By- Archana Banage