esakal | जोतिबा मंदिराची सुरक्षा फक्त एकाच पोलिसाच्या खांद्यावर; ठाणं कुलूपबंदच : Jyotiba Temple
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiba Temple

जोतिबा मंदिराची सुरक्षा फक्त एकाच पोलिसाच्या खांद्यावर; ठाणं कुलूपबंदच

sakal_logo
By
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातील कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (Ratnagiri) तथा जोतिबाचा डोंगर ता. (पन्हाळा ) (Jyotiba Temple)या ठिकाणी असणाऱ्या जोतिबा देवाच्या मंदिराची सुरक्षा गेली अनेक वर्ष केवळ एकाच पोलिसावर आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करणे गरजेचे आहे. डोंगरावर दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. याठिकाणी एकच बंदुकधारी पोलीस असून एक दिवसा एक रात्री असतो. गर्दीच्या वेळी मात्र रविवारी व पौर्णिमा या दिवशी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त असतो. याठिकाणी दूरक्षेत्र पोलीस ठाणे आहे. या इमारतीचे कामही पूर्ण झाले, उद्घाटन ही झाले. पण या ठिकाणी कर्मचारीच नाहीत. हे पोलीस ठाणे कुलूपबंद अवस्थेत आहे.

दिवंगत गृहराज्यमंत्री आर आर पाटील यांनी सात आठ वर्षापूर्वी जोतिबा डोंगरावर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात पंचवीस कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. जोतिबा डोंगरावर वर्षाकाठी सुमारे ऐंशी ते नव्वद लाख भाविक भेट देतात. दररोज ही संख्या हजाराच्या घरात असते. रविवारी व पोर्णिमा दिवशी लाखाच्या संख्येत भाविक असतात. त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात गरजेचे आहे.

काही महिन्यांपूर्वी गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई यांनी डोंगरावर भेट दिली . यावेळी जोतिबा ग्रामस्थ पुजारी सरपंच राधा बुणे , उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी येथील मंदिरात व दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात जादा पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी केली आहे. देसाई यांनीही हे काम मार्गी लावण्याची ग्वाही याप्रसंगी दिली आहे. पण त्याकडे ही यंत्रणेचे दुर्लक्षच आहे.

डोंगरावर एखाद्या भाविकाची चोरी झाली . महिला भाविकाचे पर्स व दागीने चोरीला गेले तर त्यांना थेट कोडोली पोलीस ठाणे गाठावे लागते. अनोळखी भाविक पूर्णपणे गोंधळून जातात . त्यांना या भागातील फारशी माहीती नसल्याने त्यांना फार त्रास सहन करावा लागतो . असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था या दूर क्षेत्र पोलीस ठाण्याची झाली आहे . जिल्हा पोलीस प्रमुखांनी भाविक व ग्रामस्थ पुजारी यांचा हा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आता घटस्थापनेला मंदिर सुरु होईल. गर्दीचा ओघ कायम सुरू राहणार आहे. त्यामुळे हे दुरश्रेत्र पोलीस ठाणे सुरु राहणे गरजेचे आहे.

जोतिबा डोंगरावर वाढती गर्दी लक्ष्यात घेता दुर श्रेत्र पोलीस ठाणे सर्व सोयीनी सज्ज असणे गरजचे आहे .केवळ एका पोलीसावर डोंगरची सुरक्षा व्यवस्था अवलंबुन आहे. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होते.

प्रमोद ठक्कर भाविक, पुणे

जोतिबा डोंगरावर दूरक्षेत्र पोलीस ठाणे आहे. इमारत आहे पण कर्मचारी नाहीत. ही अवस्था असून याठिकाणी जिल्हा पोलिस यंत्रणेने हे दूरक्षेत्र पोलिस ठाणे तातडीने सुरू करावे व भाविकांची गैरसोय दूर करावी .

शिवाजीराव सांगळे , उपसरपंच, जोतिबा डोंगर ता. पन्हाळा

loading image
go to top