esakal | बेळगाव निवडणूक संपताच कन्नड संघटनांची दादागिरी सुरु; RPD चे नाव बदलण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव निवडणूक संपताच कन्नड संघटनांची दादागिरी सुरु

बेळगाव निवडणूक संपताच कन्नड संघटनांची दादागिरी सुरु

sakal_logo
By
मिलींद देसाई

बेळगाव : बेळगाव महापालिकेची निवडणूक संपताच कन्नड संघटनांची कोल्हेकुई सुरू झाली असून, नेहमी गजबजलेल्या आरपीडी क्रॉसचे नाव बदलण्याचा प्रयत्न मंगळवारी सकाळी एका कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी चौकाचे नाव बदलणारा फलक हटविला असून सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरापासून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांकडून सुरू असून, पिरणवाडी येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यात आल्यापासून शहरातील मराठी फलकांना काळे फासणे, मराठी दुकानदारांना धमकावणे असे प्रकार सातत्याने सुरू असतानाच 2020 मध्ये महानगरपालिके समोर अनधिकृतरीत्या लाल पिवळा ध्वज फडकविण्यात आला. तर 14 ऑगस्ट रोजी शहराच्या विविध भागात अनधिकृतरीत्या पुतळे उभारण्याचा प्रयत्न देखील कानडी संघटनांनी केला होता. या सर्व प्रकाराबाबत मराठी भाषिकांनी सातत्याने राजकारणातून आवाज उठवला आहे. मात्र पोलीस प्रशासन कानडी संघटना पाठीशी घालत आहे. त्यामुळे कन्नड संघटनांचा उपद्रव शहरात वाढला आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवस कन्नड संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी शांत होते. मात्र सोमवारी निकाल जाहीर झाल्यापासून पुन्हा एकदा त्यांचा उपद्रव वाढत असल्या दिसून येत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांच्या विरोधात गरळ ओखळी जात आहे.

हेही वाचा: बेळगाव निवडणुकीत 40 पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात

मंगळवारी पहाटे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतरित्या आरपीडी सर्कल येथे मूठभर जमलेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वीर मदकरी नायक असे लिहिलेला नामफलक या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळतात शहरवासीयातून तीव्र .नाराजी व्यक्त झाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी लावलेला फलक हटविला. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. मात्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्यानंतर येथून कार्यकर्त्यांनी पळ काढला. मात्र कार्यकर्ते पुन्हा फलक लावण्याचा प्रयत्न करणार असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उध्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांच्यासह इतर जिल्हा अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित आहेत.

स्वातंत्र पूर्व काळापासून साउथ कोंकण एज्युकेशन सोसायटीचे आरपीडी महाविद्यालय या भागात असल्याने या सर्कलला गेल्या अनेक वर्षांपासून आरपीडी सर्कल म्हणून ओळखले जाते त्यामुळे या भागाचे नामकरण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असे मत व्यक्त होऊ लागले आहे.

loading image
go to top