एव्हरेस्टला गवसणी घालणाऱ्या कस्तुरीच्या ‘मिशन' ला ब्रेक


एव्हरेस्टला गवसणी घालणाऱ्या कस्तुरीच्या ‘मिशन' ला ब्रेक

कोल्हापूर: चक्रीवादळामुळे (cyclone) निर्माण झालेल्या असंख्य आव्हानांवर मात करून वीसवर्षीय करवीरकन्या कस्तुरी सावेकरने (Kasturi Savekar)अगदी कमी वयात खऱ्या अर्थाने एव्हरेस्टची (Everest) लढाई जिंकली आहे. प्रचंड वारे, हिमवर्षाव आणि एकूणच प्रतिकूल हवामानातसुद्धा कॅम्प चारपर्यंत तिने जिद्दीने धडक दिली; पण हवामानामुळे तिला खाली परतावे लागले. इतक्या उंचीपर्यंत एव्हरेस्टला गवसणी घालणारी ती कोल्हापूरची पहिली रणरागिणी ठरल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. (kasturi-Savekar-mession-evrest-stopped-kolhapur-news)

दरम्यान, कस्तुरी सुखरूप असून पंधरा दिवसांत तिचे कोल्हापुरात आगमन होईल. यावेळी तिचे जोरदार स्वागत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कस्तुरीच्या निमित्ताने आता कोल्हापुरात ‘मिशन एव्हरेस्ट’ मोहीम व्यापक केली जाणार असून पदभ्रमंती, गिर्यारोहणातील नव्या पिढीला तिच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके, कस्तुरीचे वडील दीपक सावेकर म्हणाले, ‘‘एव्हरेस्ट सर करण्यासाठी दोन वर्षे कस्तुरीने कष्ट घेतले. गेल्या वर्षी कोरानामुळे तिची मोहीम थांबली. अनेक अडचणींवर मात करत ती १४ मार्चला एव्हरेस्टला रवाना झाली. नियोजित मोहिमेनुसार २६ मेस तिने एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला असता; पण तत्पूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे एव्हरेस्टवर प्रचंड वारे आणि हिमवर्षावाला प्रारंभ झाला.

सुरक्षिततेसाठी म्हणून कस्तुरीसह तिच्या टीमला कॅम्प चारवरून तीनवर व पुन्हा कॅम्प दोनवर खाली यावे लागले. पुढील चढाईसाठी येथेही अनेक आव्हानांचा ही मंडळी धिटाईने सामना करत होती. एकूणच सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थानिक शेर्पा, गिर्यारोहक एजन्सी आणि सर्वच घटकांनी अखेर कस्तुरीसह टीमला बेसकॅम्पला येण्याच्या सूचना केल्या आणि त्यानुसार ती खाली परतली, तरी निसर्गाच्या रौद्ररूपामुळे तिला माघारी परतावे लागले आहे. येत्या काही वर्षांत ती येथील नव्या पिढीसह नक्कीच तिचे स्वप्न पूर्ण करेल.’’

अरविंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘तब्बल ७७ दिवस तिची मोहीम सुरू होती. मोहिमेसाठी मदतीचा हात दिला, त्या सर्वांची तिने एव्हरेस्ट सर करावा, अशीच इच्छा होती. पण निसर्गापुढे काही चालत नाही.’’ यावेळी कस्तुरीची आई मंजू सावेकर, प्रशिक्षक आनंदा डकरे, उदय निचिते, विजय मोरे, वीणा मालदीकर, दिनकर कांबळे, डॉ. विश्वनाथ भोसले, पंडितराव पोवार, डॉ. दीपक आंबर्डेकर, महेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

त्यामुळेच माघारीचा निर्णय...

प्रतिकूल वातावरणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेर्पा, प्रशासनाबरोबर चर्चा झाल्यानंतर कस्तुरीच्या टीमला खाली परतण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण, प्रत्यक्ष कस्तुरीशी संपर्क झाला नव्हता. तिच्याशी संपर्क झाल्यानंतर तिने ‘अजूनही संधी आहे. दुसरी एक टीम वर अंतिम चढाईच्या तयारीत असून त्यांना जॉईन झाल्यास नक्की पुन्हा एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहचू शकतो’ असा आत्मविश्वास व्यक्त केला. पण तिच्याबरोबरच्या शेर्पाने चढाईस नकार दिला.

दुसरा शेर्पा आणि इतर आवश्यक गोष्टी तत्काळ उपलब्ध झाल्या नाहीत. कस्तुरीचे वय पाहता ‘डू ऑर डाय’ हा निर्णय चुकीचा ठरला असता. ती सुरक्षित असेल तर तिच्यासह तिच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरातील नवी पिढी भविष्यात या क्षेत्रात नक्कीच आणखी चांगली कामगिरी करेल, या भावनेतून पुन्हा अंतिम चढाई न करण्याचा निर्णय झाला, असेही यावेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com