esakal | KDCC Election:आसुर्लेकरांच्या उमेदवारीवरून बिघाडी शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

KDCC Election: आसुर्लेकरांच्या उमेदवारीवरून बिघाडी शक्य

KDCC Election: आसुर्लेकरांच्या उमेदवारीवरून बिघाडी शक्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रक्रिया संस्था गटातील संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या उमेदवारीवरून जिल्हा बँकेतील संभाव्य आघाडीत बिघाडीची शक्यता आहे. आमदार विनय कोरे यांनी आसुर्लेकर यांना विरोध केला असून त्यांच्याकडून या गटात राष्ट्रवादीचाच उमेदवार म्हणून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. यातून ठराव दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोरे यांनी संस्थेचा एक ठराव प्रदीप पाटील-भुयेकर यांच्या नावे देऊन आपला इरादा स्पष्ट केला आहे.

या घडामोडी पाहता जिल्हा बँकेच्या राजकारणात कोरे यांची भूमिका केंद्रस्थानी राहणार आहे. जिल्हा बँकेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना, विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांना, लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना तर विधानसभेला करवीरमध्ये आमदार पी. एन. पाटील यांना कोरे यांच्या मदतीशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीतकोरे यांचा विरोध न परवडणारा आहे, त्याची दखल न घेतल्यास जिल्ह्यात शांत झालेले भाजपचे वादळ पुन्हा डोके वर काढण्याची भीती आहे. अलीकडेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीमुश्रीफ यांच्यावरच केलेले आरोप आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कोरे यांची भूमिका यामुळे मुश्रीफ यांच्यासमोरही मोठे आव्हान आहे.

पन्हाळा-शाहूवाडीच्या राजकारणात आसुर्लेकर-कोरे वाद अनेक वर्षापासून सुरू आहे. आसुर्लेकर राष्ट्रवादीचे आहेत आणि बँकेत ते प्रक्रिया संस्था गटातून निवडून आले आहेत. या गटातून दोन जागा आहेत, दुसऱ्या जागेवर खासदार मंडलिक विजयी झाले आहेत. या गटातून आसुर्लेकर यांना रोखण्यासाठी कोरे यांनी ठराव दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्याच नावे असलेल्या विनय कोरे प्रक्रिया संस्थेचा ठराव भुयेकर-पाटील यांच्या नावे करून तो दाखल केला. या ठरावावर हरकतही न आल्याने भुयेकर यांचे नावही यादीत आले. भुयेकर हेही राष्ट्रवादीचे आहेत, आसुर्लेकर यांना विरोध करताना त्यांची जागा पुन्हा राष्ट्रवीदीकडे राहील, अशी व्यव्स्था कोरे यांनी केली आहे. यापूर्वी अनेक निवडणुकीत श्री. भुयेकर हे राष्ट्रवादीचे ‘डमी’ उमेदवार म्हणून रिंगणात राहिले आहेत. नेत्यांचा आदेश आला तर त्यांचीही लढण्याची तयारी आहे.

मुश्रीफांसमोर धर्मसंकट

जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ-कोरे यांची मैत्री घट्ट आहे. राज्याच्या राजकारणात कोरे भाजपसोबत असले तरी यापूर्वीच्या विधान परिषद, ‘गोकुळ’च्या निवडणुकीत ते मुश्रीफ-सतेज पाटील यांच्यासोबत राहिले. जिल्हा बँकेत कोरे आपल्यासोबत असणे मुश्रीफ यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे, त्याचवेळी आसुर्लेकर यांना वगळणे त्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत मुश्रीफ यांच्यासमोरच धर्मसंकट ठाकले आहे.

loading image
go to top