esakal | कोल्हापूर शहराचं हे जंक्‍शन तुम्हाला माहित आहे का ?

बोलून बातमी शोधा

kolekar tikti main point in kolhapur city

कोल्हापूर - कोळेकर तिकटी म्हटलं की तो मंगळवार पेठेचा केंद्रबिंदू. येथून तीन रस्ते फुटतात. एक जातो तुरबतीवरून सुबराव गवळी तालीमकडे. दुसरा जातो  शाहू बॅंकेकडे. आणि तिसरा जातो पद्माराजे गर्ल्स हायस्कूलकडे. या तिकटी वरून रोज हजारो कोल्हापूरकर ये जा करतात. त्यामुळे कोळेकर तिकटी म्हणजे एक जंक्‍शनच आहे.  पण या तिकटीला  कोळेकर तिकटी हे नाव कसे पडले ही माहिती फक्त जुन्या पिढीलाच आहे.

कोल्हापूर शहराचं हे जंक्‍शन तुम्हाला माहित आहे का ?
sakal_logo
By
सुधाकर काशीद

कोल्हापूर - कोळेकर तिकटी म्हटलं की तो मंगळवार पेठेचा केंद्रबिंदू. येथून तीन रस्ते फुटतात. एक जातो तुरबतीवरून सुबराव गवळी तालीमकडे. दुसरा जातो  शाहू बॅंकेकडे. आणि तिसरा जातो पद्माराजे गर्ल्स हायस्कूलकडे. या तिकटी वरून रोज हजारो कोल्हापूरकर ये जा करतात. त्यामुळे कोळेकर तिकटी म्हणजे एक जंक्‍शनच आहे.  पण या तिकटीला  कोळेकर तिकटी हे नाव कसे पडले ही माहिती फक्त जुन्या पिढीलाच आहे.

ज्या वेळेला आत्ताच्या शिंगोशी (शृंगऋषी) मार्केटच्या जागेत एक तळे होते. तेथे एक विठ्ठलाचे देऊळ होते. त्याची पूजाअर्चा कोळेकर यांचे काही पूर्वज करत होते. हे कोळेकर ढेबेवाडी जवळच्या कोळेवाडी गावचे. त्यांचे काही पूर्वज इथे आले कापडाचा व्यापार करू लागले. गावागावातील आठवडा बाजाराला ते घोड्यावर कापडाची गाठोडी टाकून जात होते. त्यात त्यांचा बऱ्यापैकी जम बसला आणि जेथे तीकटी आहे तेथे कोष्टी गल्लीच्या तोंडालाच कोळेकर परिवाराचा दुमजली वाडा उभा राहिला. वाड्याचे तोंड दक्षिणेला म्हणून वाड्याच्या भिंतीवर दोन-अडीच फुटाचा मारुतीही कोरला गेला. वाड्याच्या एका दालनात विठ्ठल रुक्‍मिणी ची मूर्ती बसवली गेली. कोळेकर परिवाराच्या मूळ व्यक्तीची समाधी येथे बांधली गेली. आणि कोळेकर यांच्या वाड्याला भक्तीमार्गाची किनार लागली. पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेवाची जी चांदीची मूर्ती आहे तिची पहिली पूजा कोळेकर यांच्या वाड्यात झाली. आणि तेथून ती मूर्ती मिरवणुकीने पंढरपूरला नेण्यात आली. आजही कोल्हापुरातील नामदेव महाराज जयंती ची दिंडी कोळेकर यांच्या वाड्यातुनच निघते. या साऱ्या वातावरणामुळे या तिकटीला  कोळेकर तिकटी हेच नाव पडले. आजही तेथे कोळेकर यांचा वाडा आहे कोळेकर तिकटी हे नाव कायम आहे. किंबहुना कोळेकर तिकटी कोल्हापूरकरांच्या दैनंदिन वर्दळीचा एक अविभाज्य अंग बन ली आहे.  या तिकटीला कोळेकर वाड्या समोरच चित्रपती व्ही. शांताराम यांचे मुळ घर आजही आहे. या घराचे वैशिष्ट्य असे, की घरावरची नक्षी आहे त्यात सर्व प्रतिकृती लिखाणासाठी वापरल्या जाणाऱ्या पेनच्या आहेत. गॅलरी ही  पेनच्याच नक्षीने सजवण्यात आली आहे. व्ही शांताराम म्हणजे त्यांचे आडनाव वणकुद्रे. या वणकुद्रे यांचे कोल्हापुरात पेन व लिखाणाच्या साहित्याचे मोठे दुकान होते. आणि म्हणूनच त्यांनी घरावर नक्षी ही पेनच्या आकाराचीच केली. आजही या नक्षी सह हे घर कोळेकर तिला आपले अस्तित्व जपत उभे आहे.

कोळेकर तिकटीसमोरच पूर्वी नरके यांचा वाडा होता. तेथे घोड्याची पागा होती. त्या वाड्यात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या वाड्यातच चित्रपटाचे चित्रीकरण चालत असे. म्हणजे प्रभातच्या मुळ स्थापनेचा बिंदू कोळेकर तिकटीलाच आहे. त्यामुळे तेथे प्रभातच्या तुतारी चे शिल्प उभे केले आहे. आता मात्र जेथे प्रभात स्टुडिओ होता, तेथे एक व्यापारी संकुल उभे आहे.

कोळेकर तिकटी ओलांडली की एक रस्ता सुबराव गवळी तालमी कडे जातो. त्याच्या कोपऱ्यावरच दावल मलिक ची तूरबत आहे. ऑलिम्पिकवीर  के.डीं. माणगावे उर्फ माणगावे मास्तर यांचे. घर  तुरबतीला लागूनच आहे. पूर्वी संस्थान काळात  तुरबती जवळ करवसुलीची चौकी होती. तेथे जकात वसुली केली जात होती. त्या वेळेच्या पद्धतीनुसार कर वसुली विश्वासराव गायकवाड घराण्याकडे होती. कोळेकर वाड्यासमोरच काही अंतरावर ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आजोबांचे घर होते. काही दिवसापूर्वी सारा गोवारीकर परिवार कोळेकर  कोष्टी गल्लीत आला होता.आपल्या जुन्या घराला भेट देऊन तो परिवार गेला. स्वास्तिक क्‍लब  म्हणून मोठे मंडळ तिकटीजवळच्या कोष्टी गल्लीत आहे.

 आज कोळेकर तिकटी म्हणजे फुल वर्दळ आहे. तळे मुजवुन मार्केट झाले आहे. मध्यरात्रीचा काही काळ वगळता अन्य सर्व वेळी एक सेकंद ही कोळेकर तिकटी शांत नसते अशी परिस्थिती आहे. किंबहुना ही  तिकटी म्हणजे कोल्हापूरच्या जुन्या अस्तित्वाची जिती जागती एक स्मृतीच होऊन राहिली आहे.