esakal | Maratha Reservation - 'कोरोनाच्या नावाखाली केवळ चालढकल'; संभाजीराजेंचा राज्यसरकारवर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

sambhajiraje

Maratha Reservation - 'कोरोनाच्या नावाखाली केवळ चालढकल'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे; तोपर्यंत मराठा समाजाला सोयीसुविधा देणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. तीन महिने झाले तरी याबाबत राज्य सरकारने काही केलेले नाही. कोरोनाच्या नावाखाली केवळ चालढकल सुरू आहे, असा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी २५ ऑक्टोबरनंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे यांनी भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मूलभूत सुविधा राज्य शासनाने अद्याप दिलेल्या नाहीत. सारथी सोडून इतर गोष्टींबाबत शासनाने काहीही केलेले नाही. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘सुपर न्यूमररी’ अधिनियम काढून नियुक्त्या देणे गरजेचे आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत तीन महिने काहीही केलेले नाही. ओबीसींप्रमाणे शिक्षणाच्या सवलती दिलेल्या नाहीत. कोरोनामुळे दोन वर्षे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र तेही पाळले नाही.

हेही वाचा: कोल्हापूर : प्रभागनिहाय लोकसंख्येचे वर्गीकरण

पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग निर्माण करणे व सर्वेक्षण करणे गरजेचे होते. आजही अशोकराव चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी काहीही केलेले नाही. असा खेळ करून चालणार नाही. कोरोना संकटामुळे तीन-चार महिने मराठा आरक्षणासंदर्भात शांत बसलो होतो. मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रे, निवेदने दिले. त्यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू ठेवला. त्याला उत्तरे येत नाहीत, सकारात्मक चर्चा होत नाही आणि कोणतीही कार्यवाही नाही. यामुळे मराठा आरक्षणाच्या लढाया पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यव्यापी दौरा करणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात पनवेल, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, धाराशिव, नगर जिल्ह्यातून दौरा होईल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाला जोडण्यासाठी माझा लढा सुरू आहे. सरकारने आपला शब्द पाळावा; अन्यथा उद्रेकाला सामोरे जावे लागेल.’’

हेही वाचा: कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत किसानचे अर्ज वादात

काठी हातात घेण्यात आक्रमकता नाही.

मराठा आरक्षण लढ्यासंदर्भात होणाऱ्या टीकेवर संभाजीराजे म्हणाले, ‘‘टीका करणारे समाजासाठी काय करतात, हे पाहणेही गरजेचे आहे. त्यांनी टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा समाजासाठी सकारात्मक दृष्टिकोन दाखवावा. गप्प बसणे किंवा काठी हातात घेणे यावरून मवाळ आणि आक्रमकता ठरत नाही. कायदा हातात घेऊन आक्रमकता दाखवणे, मला पटत नाही आणि छत्रपती घराण्याला शोभतही नाही. लोकांना वेठीस धरण्यात काय अर्थ? वेळ आलीच तर मूकमोर्चा, लाँगमार्च व आझाद मैदानात उपोषणाची आपली वैयक्तिक तयारी आहे.’’

loading image
go to top