
कोल्हापूर : योजनांचा लाभ घ्या; स्वाभिमानाने जगा
कोल्हापूर : समाजात सन्मानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास बाळगा. कष्ट करून आत्मसन्मानाने व स्वाभिमानाने जगा, यासाठी प्रशासन निश्चितच सहकार्य करेल. तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी स्वत:हून पुढाकार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज येथे केले. कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्यात येणाऱ्या तृतीयपंथी गौरी पोवार यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन येथे तृतीयपंथी सर्वसमावेशक एक दिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने कार्यशाळा झाली. तृतीयपंथीयांना सेल्फी घेत कार्यशाळेचा आनंद घेतला.
तृतीयपंथीयांची वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक माहिती घेऊन त्यांना आवडीनुसार, क्षमतेनुसार कौशल्य शिक्षण दिले आहे. यापुढेही प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन रोजगार उपलब्ध करून देता येईल. तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत असेही आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.
तृतीयपंथीयाच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय सदस्य श्रीगौरी सावंत म्हणाल्या, ‘‘तृतीयपंथीयांच्या काही महत्वाच्या गरजा आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी ते आक्रोशातून भावना व्यक्त करतत. जीवन जगताना पैसा ही प्रत्येकाची गरज आहे. तृतीयपंथीयांनी सक्षम होण्यासाठी अधिकाधिक योजनांची निर्मिती व्हायला हवी. तृतीयपंथीयांना समाजासोबत समाजातच रहायचं आहे, पण समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी.’’
मंडळाच्या राज्य व जिल्हा सदस्य ॲड. दिलशाद मुजावर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तृतीयपंथीय समाजाच्या बदलाची सुरुवात जिल्ह्यात होत आहे, ही चांगली बाब असल्याचे सांगितले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी तृतीयपंथीयांनी रोजगाराचे परंपरागत साधन बदलून कौशल्य प्रशिक्षण घेवून व्यवसाय करावेत. यासाठी प्रशासन नेहमीच सोबत राहील,असा विश्वास दिला.
सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम कुमार पाटील, मयुरीताई आळवेकर, जिल्हा प्रतिनिधी अमृता सुतार तसेच तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Kolhapur Advantage Self Respect Schemes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..