esakal | सोमवारपासून कोल्हापूर होणार अनलॉक; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Action by police if shops are started in Ichalkaranji

सोमवारपासून कोल्हापूर होणार अनलॉक; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर: जिल्ह्यातील सात दिवसांमधील सरासरी आरटीपीसीआर (RTPCR)पॉझिटिव्हिटी रेट ९.७ टक्के आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश स्तर तीनमध्ये झाला. त्यामुळे सध्या लागू असणारे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सोमवारपासून शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत; मात्र शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (District Disaster Management Authority) बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.(kolhapur-all-shops-start-from-monday-lockdown-trending-news-akb84)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून जिल्ह्यात निर्बंध लागू केले होते. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद होती. सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेटनुसार स्तर ठरवण्यात आले होते. यामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रेट आल्यास त्या जिल्ह्यांचा समावेश स्तर चारमध्ये करण्यात आला होता. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूरचा समावेश स्तर चारमध्ये होता; मात्र गुरुवार (ता. ८) ते बुधवार (ता. १४) या सप्ताहात सरासरी आरटीपीसीआर पॉझिटिव्ह रेट ९.७ टक्के आला असल्याने जिल्ह्याचा समावेश स्तर तीनमध्ये करण्यात आला. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत.

सायंकाळी पाचनंतर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू होतील. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण लॉकडाउन असेल. सर्व दुकाने, खासगी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे बंधनकारक असेल. दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याने व्यापारीवर्गात उत्साह आहे. व्यापाऱ्यांच्या संघर्षाला यश आल्याने आता मोकळेपणाने त्यांना व्यवसाय करता येणार आहे.

हेही वाचा: अण्णा भाऊ साठे प्रकाशन समिती कागदावरच; शासनस्तरावर उदासीनता

वीकेंड लॉकडाउन कायम

जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाउन असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दररोज सायंकाळी पाचनंतर जमावबंदी लागू असणार आहे.

हे सुरू राहणार

सर्व दुकाने, खासगी आस्थापना, मैदानांवर पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत खेळणे, फिरणे, व्यायाम यांना परवानगी.

हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांचे स्टॉल यांना पार्सल परवानगी

बांधकामांना सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत परवानगी

लग्न समारंभाला २५ तर अंत्ययात्रेसाठी २० जणांची मर्यादा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभा, सहकारी संस्थांच्या सभा यांना ५० टक्के उपस्थिती

केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू

परराज्यातून येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

loading image