esakal | पहिल्या दिवशी 'अंबाबाई'ची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या दिवशी 'अंबाबाई'ची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा

उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज देवीची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.

पहिल्या दिवशी 'अंबाबाई'ची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा

sakal_logo
By
- संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देवून घटस्थापना झाली आणि नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज देवीची ब्रम्हाणी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.

हेही वाचा: उदे गं अंबे उदे! कोरोना नियमांचे पालन करत भाविकांनी घेतले दर्शन

‘सप्तमातृका‘ या संकल्पनेवर उत्सवातील नऊ दिवस श्री अंबाबाईच्या पूजा बांधल्या जाणार आहेत. ब्रम्हाणी ही ब्रम्हदेवाची शक्ती आहे. ही चारमुख असणारी व चतुर्भूज आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये जपमाळ, कमंडलू, पुस्तक व घंटा आहे. तिचे वाहन हंस असून सप्तमातृकांपैकी ही प्रथम मातृका असल्याचे श्रीपूजक चेतन चौधरी, लाभेश मुनीश्वर यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, श्रीपूजक शेखर मुनीश्‍वर, शरद मुनीश्वर, मकरंद मुनीश्‍वर, सुहास जोशी, किरण लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना झाली. मंदिरात यंदा ऑनलाईन बुकिंग करून भाविकांना दर्शन दिले जाणार असून शिवाजी चौकातूनच दर्शन रांगेत प्रवेश आहे. बुकींगचा मेसेज दाखवल्यानंतर थर्मल स्क्रिंनींग आणि सॅनिटायझेशन झाल्यानंतरच दर्शन रांगेत प्रवेश दिला जातो आहे. तासाला सातशे याप्रमाणे दिवसभरात दहा हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.

हेही वाचा: बेळगाव - ‘पॅट्रिआरकी अँड द पँगोलिन’ पुस्तकाला टॉप-१० चा मान

मुखदर्शनाची सोय महाव्दार येथे असून त्यासाठी बिनखांबी गणेश मंदिरापासून दर्शन रांग आहे. श्री अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनासाठी शहरातील दहा ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन उभारले आहेत. दरम्यान, ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह शहरातील नवदुर्गा मंदिरातही पारंपरिक उत्साहात घटस्थापना होवून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.

loading image
go to top