कोल्हापूर : नरवणे यांनी घेतली अंबाबाई मंदिराची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कोल्हापूर : नरवणे यांनी घेतली अंबाबाई मंदिराची माहिती

कोल्हापूर : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि वीणा नरवणे यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेत मंदिराची माहिती जाणून घेतली. माजी लष्करप्रमुख दर्शनाला आल्याचे समजताच उपस्थित भाविकांनीही ‘भारत माता की जय’ अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून सोडला. दरम्यान, टाऊन हॉल येथील वस्तुसंग्रहालयाला भेट देऊन त्यांनी बावीसशे वर्षांपूर्वीचं कोल्हापूरही अनुभवले. दरम्यान, चप्पल लाईनमध्ये कोल्हापुरी चप्पलांची खरेदीही त्यांनी केली.

अंबाबाई मंदिरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाचे माधव मुनीश्वर, ॲड. केदार मुनीश्वर यांनी मंदिराची माहिती दिली. मातृलिंग मंदिरालाही त्यांनी भेट दिली. श्रीपूजक आशुतोष ठाणेकर, सचिन ठाणेकर, ऐश्वर्या मुनीश्वर आदी उपस्थित होते. श्रीपूजक मंडळातर्फे त्यांचे स्वागत झाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी स्वागत केले. व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.

अंबाबाई मंदिरानंतर टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. १८७२ ते ७६ या काळात टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयाची वास्तू उभी राहिली. गॉथिक शैलीची ही वास्तू देखणेपण व भक्कमतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. त्यात ज्या प्राचीन वस्तू आहेत त्याचे संदर्भ कोल्हापूरच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीशी जुळणारे आहेत. किंबहुना प्राचीन कोल्हापूरचा वारसा या संग्रहालयात आहे. इसवी सन पूर्व दोनशे म्हणजेच साधारण बावीसशे वर्षांपूर्वी कोल्हापुरातील नागरी जीवनात काय काय घडत होते? याचे पुरावेच येथे असल्याची माहिती सहायक अभिरक्षक उदय सुर्वे यांनी दिली.

जगभरातील विविध देशांशी प्राचीन काळापासून कोल्हापूरच्या असलेल्या संबंधांपासून ते कलातपस्वी आबालाल रहेमान, बाबूराव सडवेलकर, गणपतराव वडणगेकर, चंद्रकांत मांडरे, माधवराव बागल आदींच्या मूळ चित्रांसह दुसऱ्या महायुद्धातील शस्त्रांचीही माहिती देण्यात आली. या वेळी उत्तम कांबळे, अर्चना शिंदे, आदित्य माने आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur Ambabai Temple Naravane Took Information

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..