
कोल्हापूर : पूरबाधित ३२ ठिकाणी जनावरांच्या छावण्या
कोल्हापूर : महापुराच्या काळात दुभत्या जनावरांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पूरबाधित गावांच्या शेजारी ३२ ठिकाणी जनावरांच्या छावण्या उभारण्यात येणार आहेत. यात २५ हजारांहून अधिक जनावरांची व्यवस्था होणार आहे. संभाव्य पुराचा धोका समजल्यास जनावरे मालकांनी जनावरे वेळीच छावणीत स्थलांतरित करावीत. यात हयगय होऊन महापुरात जनावरे वाहून गेल्यास संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
तीन वर्षांपूर्वी पंचगंगा व कृष्णा नदीला पूर आला. पुराचे पाणी गावात घुसले तसे लोक स्थलांतरित झाले; मात्र पाण्याचा वेग अचानक वाढला. जनावरे स्थलांतरित करण्यास वेळ मिळाला नाही. जवळपास दीड हजारांवर दुभती व पाळीव जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. २०२१ च्या पुराच्या तुलनेने पशुधनांची हानी कमी झाली. यंदा मात्र जनावरे स्थलांतरित करण्याबाबत कोणी हलगर्जीपणा करू नये, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पूरबाधित क्षेत्रात जनावरांसाठी छावणी व चाऱ्याची सुविधा केली जाणार आहे. जिल्ह्यातील पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर येतो. अवतीभोवतीची २७ गावे पुराने वेढली जातात. या गावातील पशुधनाचे तपशील पशुसंवर्धन विभागाने संकलित केले आहेत. या गावातील पशुधनाला लसीकरण करून घेतले आहे. यापुढे निविदा प्रक्रियेद्वारे छावणी प्रकल्प राबवला जाणार आहे.
पशुधनासाठी पुढे या...
पशुधनाचे महापुराच्या काळात हानी होऊ नये, यासाठी तयारी सुरू केली आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे. महापुरात त्यांचे अन्नावाचून म्हणजेच चाऱ्याविना हाल होतात. कोल्हापूर जिल्हा अंबाबाईचे स्थान आहे. मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी अन्नदानाचे महत्त्व ही तितकेच आहे. ज्या पद्धतीने आपल्या या क्षेत्रात एकही माणूस उपाशी राहू शकत नाही, त्याच पद्धतीने हे पशुधन ही उपाशी राहता कामा नये. महापूर आल्यानंतर मदतीसाठी पुढे येण्यापेक्षा आत्तापासूनच अंबाबाईच्या या क्षेत्राचे महत्त्व अबाधित राहण्यासाठी या पशुधनासाठी मदतीसाठी पुढे यावे. या महापुरात एकही पशुधन दगावणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पूर येत असल्यास प्रशासनातर्फे गावांना धोक्याचा इशारा दिला जातो. स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जाते. जनावर मालकांनी धोका न पत्करता जनावरे छावणीत स्थलांतरित करावीत. छावणीत जनावरांना चारा, पशुखाद्य दिले जाईल. आजारी जनावरांची तपासणी करून उपचारही केले जातील. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनीही दक्षता घेण्याची सूचना केली आहे. जनावरमालकांनी याचा लाभ घ्यावा.
Web Title: Kolhapur Animal Camp Endangered During Floods
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..