
कोल्हापूर : फुलेवाडीत आढळला ‘ब्लॅक पर्ल’ वृक्ष
कोल्हापूर : फुलेवाडी परिसरात ‘ब्लॅक पर्ल’ हा विदेशी वृक्ष आढळून आला. वृक्षप्रेमी परितोष ऊरकुडे यांना हा अनोळखा वृक्ष आढळल्यानंतर त्यांनी वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांना या वृक्षाचे छायाचित्र पाठवले. डॉ. बाचूळकर यांनी संदर्भ ग्रंथ पाहिल्यानंतर हा वृक्ष मध्य आफ्रिकेतील असल्याचे लक्षात आले. हा वृक्ष रिठा कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव ‘माजिडिया झँग-सुईबारिका’ असे आहे. आजपर्यंत या वृक्षाची नोंद कोल्हापूर जिल्ह्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या वनस्पतीकोशात आढळून आली नव्हती. फुलेवाडीत हा वृक्ष आढळल्यानंतर प्रथमच या वृक्षाची नोंद महाराष्ट्र वनस्पतीकोशात केली.
ब्लॅक पर्ल हा वृक्ष फुलेवाडीतील अग्निशामक विभागाच्या मागे असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर परिसरात लागवड केला आहे. वृक्षाच्या वैशिष्ट्यपूर्ण बियांवरून या वृक्षाला ब्लॅक पर्ल असे नाव पडले आहे. या वृक्षाच्या बिया गोलाकार, वाटाण्याएवढ्या आकाराच्या, काळ्या रंगाच्या पण त्यावर पारदर्शक, रेशमी, मुलायम, मखमली अशी लव असल्याने या बिया काळ्या मोत्यांप्रमाणे दिसतात. यामुळेच या वृक्षाला ‘ब्लॅक पर्ल’ असे नाव जगभर प्रचलित झाल्याची माहिती डॉ. बाचूळकर यांनी दिली.
ब्लॅक पर्लचे पर्णझडी वृक्ष तीन ते आठमीटर उंचीपर्यंत वाढतात. पानगळ थोड्या काळासाठी होते. खोड १२ ते २० सेंटीमीटर व्यासाचे असून साल पांढरट-पिवळसर ते करड्या रंगाची असते. पाने एक व संयुक्त प्रकारची असून २५ ते ४० सेंमी लांब असतात. पर्णिकांच्या ७ ते ११ जोड्या असून देठाकडील पर्णिका लहान व टोकांकडील मोठ्या असतात. जूनमध्ये फुलांचा बहर येतो. फुले आकाराने लहान पांढरट - पिवळसर व लाल रंगाचा शिडकाव असलेली, मंद सुवासिक असतात. पुष्पमंजिऱ्या १० ते ३० सेंमी लांबीच्या असून त्या फांद्यांच्या टोकांना येतात. फुले एकलिंगी पण नर व मादी फुले एकाच पुष्पमंजिरीत येतात. संदले व पाकळ्या सुट्या व प्रत्येकी चार असून लगेच गळून पडतात. फळे त्रिकोणी आकाराची, लांबीपेक्षा रूंदी जास्त असणारी, हिरवट रंगाची व पिकल्यावर बदामी - तपकीरी रंगाची होतात. फळे वाळल्यानंतर तीन भागात उकलतात.
Web Title: Kolhapur Black Pearl Tree Found
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..