
कोल्हापूर : स्मशानभूमीत सुविधांचीच ‘असुविधा’
कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीवर सुविधांची दुरवस्था सुरू आहे. हात धुण्याच्या चावींच्या फरशांचे बॉक्स तुटून गेले आहेत. पाणी उघड्यावर वाहत जाऊन नागरिकांच्या उभे राहण्याच्या ठिकाणी गटार तयार झाली आहे. बेडची जादा सोय केलेल्या शेडमध्ये तसेच मोकळ्या जागेवर माती व कचऱ्याचा ढीग साठला आहे. शेणीच्या गोडावूनच्या एका शेडची भिंतच कोसळली आहे. महापालिकेचे कित्येक महिने इकडे लक्ष नसल्याचे जाणवते. पंचगंगा जुन्या स्मशानभूमीत महापालिकेने सुविधा दिल्या. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनीही वेगवेगळ्या सुविधा दिल्या आहेत. गरज लागेल तशी दहन करण्यासाठीच्या बेडच्या शेडची उभारणी झाली. बेडची संख्या वाढली असली तरी या स्मशानभूमीवर ताण आहे. कोरोनानंतर इकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. त्यातून अनेक सुविधा खराब झाल्या आहेत.
नागरिकांना हात धुण्यासाठी दोन ठिकाणी चाव्यांची व्यवस्था आहे. चाव्यांसाठी केलेले फरशांचे बॉक्स तुटले आहेत. एका ठिकाणी तर चाव्यांशिवाय काहीच नाही. त्यामुळे तिथून बाहेर पडणारे पाणी नागरिकांना बसण्यासाठी केलेल्या शेडसमोरील पेव्हिंग ब्लॉकवरून वाहते. चाव्यांच्या ठिकाणी कचरा झाला आहे. या दहन शेडसमोर एका बाजूला मोकळी जागा असून तिथे लॉन केले होते. ती जागा म्हणजे कचऱ्याची जागा झाली आहे. एका बाजूला बांधलेल्या शेडमध्येही असाच कचरा झाला आहे. एका शेडमधील बेड तर मातीने मुजले आहेत.
शेणी, लाकडे साठवणुकीसाठी स्मशानभूमीसमोरच गोडावून बांधले आहे. त्यातील मोठ्या असलेल्या गोडावूनमध्ये शेणी व लाकडे भरून बाहेरही ठेवली आहेत. त्या गोडावूनमध्ये दररोज कर्मचारी शेणी, लाकडे आणण्यासाठी ये-जा करतात. त्याची समोरील भिंत धोकादायक आहे. त्याच्या बाजूला असलेल्या नवीन गोडावूनची भिंत कोसळली आहे. त्यामुळे ते गोडावून विनावापर पडून आहे.
पावसात शेणी भिजण्याची शक्यता
मोठ्या गोडावूनमध्ये जागा उपलब्ध नसल्याने काही शेणी बाहेरच ठेवल्या आहेत. अनेक वेळा शेणी मिळत नसल्याने महापालिका नागरिकांना शेणी दान करण्याचे आवाहन करते. आता हातात असलेल्या शेणी पावसात भिजण्याची शक्यता आहे.
विस्तारीकरणाचा प्रस्ताव ठप्पच
पंचगंगा स्मशानभूमीवर पडणारा ताण लक्षात घेऊन विस्तारीकरणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी तयार केला आहे; पण त्याचे पुढे काही झालेले नाही. वाहनांचे पार्किंग, लाकूड-शेणी ठेवण्याची जागा, तसेच प्रशस्त आवार या विस्तारीकरण आराखड्यात आहे.
Web Title: Kolhapur Cemetery Facilities Inconvenience
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..