
कोल्हापूर : राष्ट्रवादीसमोर ‘संकल्प’पूर्तीचे आव्हान
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेची सांगता शनिवारी (ता. २२) कोल्हापुरात विराट ‘संकल्प’ सभेने झाली. ‘सभेमुळे कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ‘रिचार्ज’ झाला असला तरी आगामी निवडणुकींचा विचार करता आणि जिल्ह्यातील पक्ष संघटन बघता ‘संकल्प’पूर्तीचे पक्षांसमोर आव्हान असेल. कोल्हापूर जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यात दोन खासदार आणि पाच आमदार या पक्षाचे होते. २३ वर्षांचा विचार केला तर या कालावधीत पक्षाने कमावले कमी पण गमावले जास्तच. आज पक्षाचा एकही खासदार नाही, २०१४ ला आघाडीच्या राजकारणात या जागा पक्षाला मिळतील, का नाही? याबाबत सांशकता आहे. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील वगळता इतर विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण? हा पक्षांसमोर प्रश्न असेल. जिल्हा बँकेत पक्षाची एकहाती सत्ता असली तरी तिथेही काँग्रेसशिवाय काही करता येत नाही.
जिल्हा परिषद, महापालिकेत यापूर्वी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्याशिवाय पक्षाला सत्तेत जाता येत नाही अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादीसमोरचे आव्हान असेल. तपोवन मैदानावर काल झालेल्या विराट सभेतून पक्षाची ताकद कळाली; पण ही ताकद मतांत परिवर्तन करणे हे पक्षांसमोर आव्हान असेल. मंत्री मुश्रीफ यांच्या नेटक्या नियोजनामुळे ही सभा मोठी झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘ऊर्जा’ आहे. त्यामुळे या सभेला गर्दी झाली. मात्र, जिल्ह्यात प्रभावी असे पक्ष संघटन दिसत नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये तर विधानसभेसाठी आर. के. पोवार यांच्यापुढे नांव जात नाही. शाहूवाडी, कोल्हापूर दक्षिण, शिरोळ या तीन मतदारसंघात पक्षांकडे विधानसभा लढवेल, असा ताकदीचा उमेदवार नाही. इचलकरंजीत पक्षांतर्गतच दोन गटांत वर्चस्ववाद आहे. राधानगरीत माजी आमदार के. पी. पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या पाहुण्यातच टोकाची ईर्ष्या आहे. हातकणंगलेत ‘जनसुराज्य’चे माजी आमदार राजीव आवळे यांच्या रूपाने तगडा उमेदवार मिळाला; पण त्यांच्या मतदारसंघात श्री. पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची त्यांची तयारी असूनही त्यासाठी कोण पुढाकार घेत नाही.
दोन तालुक्यांतच पक्ष मजबूत
कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या रूपाने पक्षाची ताकद आहे. मात्र, कागल नगरपालिकेत त्यांना काठावरचे बहुमत आहे. मुरगूड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा आहे. गडहिंग्लज नगरपालिकेवर जनता दलाची सत्ता आहे. चंदगडमधील वेगळ्या राजकीय परिस्थितीतून २०१९ ला पक्षाचा आमदार झाला; पण २०२४ ला पुन्हा ही जागा राखण्याचे आव्हान असेल. कागलमध्ये श्री. मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी रान उठवले आहे, परिणामी श्री. मुश्रीफ यांना मतदारसंघातूनच बाहेर पडता येईल का नाही? अशी स्थिती आहे.
कार्यकर्त्यांची फौज; पण...
पक्षात कोल्हापूर शहरासह काही तालुक्यात दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची चांगली फौज आहे. मात्र, घराणेशाहीच्या नादात या कार्यकर्त्यांना संधी देताना नेतृत्वाचा कस लागतो. नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे सूतोवाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी झालेल्या सभेत केले असले तरी कोल्हापुरात याची अंमलबजावणी होईल का? हा प्रश्न आहे.
Web Title: Kolhapur Challenge Of Fulfilling Resolution Ncp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..