esakal | Kolhapur | शहरातील पार्किंग हाऊसफुल्ल
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील पार्किंग हाऊसफुल्ल

कोल्हापूर : शहरातील पार्किंग हाऊसफुल्ल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रउत्सवानिमित्त पार्किंग हाऊसफुल्ल झाले असताना वाहतूक कोंडीमुळे शहरवासीयांचा श्‍वास गुदमरत आहे. माळकर तिकटी, लुगडी ओळ, लक्ष्मीपुरी, भाऊसिंगजी रोड, पापाची तिकटी, बुधवार पेठेचा मुख्य रस्ता, मंगळवार पेठेचा मुख्य रस्ता, ताराबाई रोड, बाबुजमाल परिसर येथे वाट काढणेही मुश्‍कील झाले आहे.

अंबाबाईच्या दर्शनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत. स्टेशन रोडवरून व्हीनस कॉर्नरपर्यंतच गाडी कशीबशी नीट येते. तेथून पुढे चालकाची तारेवरची कसरत सुरू होते. व्हीनस कॉर्नर ते फोर्ड कॉर्नरपर्यंत गाडी पुढे सरकारला किमान पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागतो. लक्ष्मीपुरीत सिग्नलपासून पुढे सरकल्यानंतर महाराणा प्रताप चौकापर्यंत वाहन पोहचेपर्यंत अशीच स्थिती. महाराणा प्रताप चौक ते महापालिका हा रस्ता ओलांडताना नाकीनऊ येते.

हेही वाचा: चांगभलंच्या जयघोषात जोतिबाचा उद्या होणार पहिला पालखी सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज चौकाला वळसा घालणे म्हणजे कठीण काम. पुढे चप्पलाईनचे खड्डे हैराण करतात. पापाची तिकटी ते गंगावेस, रंकाळा बसस्थानक, रंकाळा टॉवरपर्यंत वाहनचालकांची जीवघेणी कसरत होते. रंकाळा टॉवर ते फुलेवाडी नाक्‍यापर्यंत रात्री दोन चार तास वगळता वाहतूकीची कायम वर्दळ असते. मिरजकर तिकटी ते बिंदू चौक, शिवाजी रोड असा वाहतुकीचा बोजवारा उडतो. परगावची वाहने, त्यात स्थानिक दुचाकी, चारचाकी, रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे श्‍वास घेणे मुश्‍कील बनले आहे.

नवरात्रीमुळे शिवाजी चौक ते भवानी मंडप, करवीर नगर वाचन मंदिर रस्ता, बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याचा फटका अन्य रस्त्यांवरील वाहतुकीला बसला आहे. बिंदू चौक पार्किंग अड्डा दोनशेहून अधिक चारचाकी वाहनांनी हाऊसफुल्ल झाला आहे.

loading image
go to top