
कोल्हापूर : बंदिस्त पार्किंग आठ दिवसांत खुले करा
कोल्हापूर: पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी राजारामपुरीतील बंदिस्त पार्किंग आठ दिवसांत खुली करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिले. या संबंधीचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने केले आहे. मुख्य रस्त्यावरील बाजू पट्ट्याचे डांबरीकरण करून तातडीने पट्टे मारण्यात येतील. तसेच, ‘केएमटी’च्या आरक्षित जागेवर बहुमजली पार्किंगसंबंधी आलेल्या सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
राजारामपुरीतील पार्किंगचा प्रश्नाबाबत पोलिस प्रशासन, महापालिका आणि नागरिक यांची पहिल्या गल्लीतील राजाराम गार्डन येथे बोलविलेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राजारामपुरी हे कोल्हापूरचे वैभव व अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथील वाहतुकीचा, पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सार्वजनिक प्रश्न आहे. तो एकमेकांच्या सहकार्यातून सोडवावा लागेल. रात्रीच्या कोल्हापुराचे सर्वेक्षण करणार आहोत. त्याआधारे दिवसा होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचे नियोजन केले जाईल. रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवली जातील. साईट पट्टीवर डांबरीकरणासाठी ५० लाखांचा निधी महापालिकेने द्यावा.
माऊली चौकाजवळील केएमटीची जागेवर बहुमजली पार्किंग करण्याच्या सूचना अनेकांनी मांडल्या. यावर सकारात्मक विचार केला जाईल. पण केएमटीची आर्थिक स्थिती पहाता हा प्रकल्प बिओटी तत्वावरच करावा लागेल. व्यापाऱ्यांना त्यांची वाहने या ठिकाणीच पार्किंग करावी लागतील. सिग्नलच्या भागात ३० मीटरमध्ये कोणतीही वाहने पार्किंग केली जाणार नाहीत याची जबाबदारी पोलिस प्रशासनाने घ्यावी.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी. त्यासाठी निधी दिला जाईल. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, की राजारामपुरीतील रस्त्यावरील अतिक्रमणे लवकरात लवकर हटवली जातील. या भागातील वाहतूक नियोजनाचा आराखडा तयार करून तो पालकमंत्र्यांसमोर सादर केला जाईल. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, या भागाची पोलिस, महापालिका अशी संयुक्त पाहणी केली जाईल. दुकानांसमोर लावलेल्या लोखंडी जाळ्या, दगड, फलक हटवून जागी खुली केली जाईल.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी, कॉमन मॅन ॲड. बाबा इंदूलकर, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, माजी नगरसेवक अनिल कदम, प्रज्ञा उत्तुरे, शिवाजी कवाळे, काका पाटील, लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव, नितीन पाटील, राजू लिंग्रस, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, माणिक पाटील-चुयेकर आदींनी पार्किंगबाबत उपया सूचविले. अंकूश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शहर पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, माजी उपमहापौर संजय मोहिते आदी उपस्थित होते.
बैठकीत पुढे आलेल्या सूचना
एकेरी मार्गाची दिशा बदला सम-विषम पार्किंग करा
मुख्य मार्गावरील बस वाहतूक वळवा
रस्त्यावरील लोखंडी जाळ्या, अतिक्रमणे हटवा
सिग्नलच्या भागात ३० मीटरमध्ये नो पार्किंग झोन करा
व्यापाऱ्यांनी टू व्हीलरचा वापर करावा
राजकीय बैठक नव्हे...
ॲड. इंदूलकर यांनी बैठकीत टाऊन प्लॅनिंगच्या कारभाराबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना वेळीच रोखत ही बैठक राजकीय नव्हे, तर केवळ पार्किंगसंदर्भात असल्याचे सांगितले.
Web Title: Kolhapur Closed Parking Eight
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..