Kolhapur News: कोरोनाचे ३३ हजार डोस कालबाह्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur News

Kolhapur News: कोरोनाचे ३३ हजार डोस कालबाह्य

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस घेण्यासाठी शासनाकडून आवाहन केले जात आहे. दुसरीकडे एक वर्ष पूर्ण झालेल्या तब्बल ३३ हजार लशीचे डोस कालबाह्य झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात बूस्टर डोससाठी सात हजार ३०० लस मिळाली आहे. प्रत्येक केंद्रासाठी शंभर लस पाठवली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील प्रत्येक प्रभाग, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा व तालुका पातळीवरही कोरोना प्रतिबंधक लस दिली जात होती.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस ३१ लाख ५१ हजार ९४९ लोकांनी घेतला आहे. दोन लाख ४२ हजार ३८ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचे काम निरंतर सुरू होते. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ नंतर कोरोनाच रुग्ण कमी होत गेले. जिल्हा कोरोनामुक्त झाला. दुसरा डोस घेण्याकडे लाखो लोकांनी पाठ फिरवली.

नवीन लस मागविण्याऐवजी पहिली लस संपविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. तरीही, जिल्ह्यात ३३ हजार कोरोना प्रतिबंधक लस ३१ डिसेंबर २०२२ ला कालबाह्य (एक्सपायर) ठरल्या आहेत. या सर्व लशी बाद करण्यात आल्या आहेत.

खासगी रुग्णालयात एक डोस घेण्यासाठी ६०० रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. अशा शासनाकडे आलेल्या डोसची किंमत गृहीत धरली, तर ही किंमत दीड ते दोन कोटींपर्यंत जाते.

ज्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही, अशा लोकांनी दुसरा डोस घेतला पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात होते. ग्रामपंचायतींकडूनही दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

मोठ्या प्रमाणात लस शिल्लक राहिली. ३१ डिसेंबरला ३३ हजार डोस कालबाह्य ठरल्याने आरोग्य विभागाने या सर्व लशी बाद केल्या आहेत. या लशीचा वापर होऊ नये.

याची दक्षता घेतली आहे. सध्या बूस्टर डोससाठी सात हजार ३०० लस मिळाली आहे. ज्यांनी पहिला दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी बूस्टर डोस घेतल्यास त्याचा फायदा होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन केले जात आहे.

दृष्टिक्षेपात

पहिला डोस ३१ लाख ५१ हजार ९४९ लोकांनी घेतला

दोन लाख ४२ हजार ३८ लोकांनी घेतला दुसरा डोस

नवीन लस मागविण्याऐवजी पहिली लस संपविण्यावर सध्या भर

बूस्टर डोससाठी जिल्ह्यात सात हजार ३०० लस उपलब्ध

जिल्ह्यात बूस्टर डोससाठी लस मिळाली आहे. मागणीनुसार या लशीचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये ३३ हजार लशीचे डोस कालबाह्य ठरले आहेत. ते पुन्हा वापरता येत नाहीत.

डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी