Kolhapuer News गडहिंग्लजमधील जखमी हमालाचा मृत्यू | Kolhapur crime death case murder incident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 संतोष शंकर पोवार

Kolhapuer News : गडहिंग्लजमधील जखमी हमालाचा मृत्यू

गडहिंग्लज : दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी रोड परिसरातील एका हमालाचा उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला. संतोष शंकर पोवार (वय ५०, रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी रफिक मुल्ला व अमर नेवडे (रा. गडहिंग्लज) या संशयितांविरुद्ध पोलिसांत आज खुनाचा गुन्हा दाखल झाला.

शहरातील लक्ष्मी मंदिर परिसरात रोज भाजीमंडई भरते. मूळचे गिजवणेचे असलेले संतोष हे भाजी व्यापाऱ्यांकडे हमाली आणि मिळेल ती कामे करीत होते. त्यांना मद्याचेही व्यसन होते. यामुळे ते लक्ष्मी रोड परिसरातच राहत होते. मंगळवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास त्यांची कोणाबरोबर तरी वादावादी झाली होती.

त्या वेळी झालेल्या मारहाणीत ते डांबरी रोडवर कोसळले. त्यानंतर मारहाण करणारे तेथून निघून गेले. काही कालावधीनंतर संतोष तेथून उठून नेहमीच्या ठिकाणी जाऊन झोपले. काल (ता. ८) सकाळी ते लवकर उठले नाहीत. यामुळे भाजी विक्रेत्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न दिल्याने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेले.

जमिनीवर जोराने कोसळून गंभीर मार लागल्याने त्यांच्या डोक्यात रक्तस्राव झाला असून, त्यातच ते बेशुद्ध झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना तातडीने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा आज पहाटे अडीचच्या सुमारास मृत्यू झाला.

संतोष यांच्या मागे पत्नी व मुलगा आहे. मुलगा रोहित हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. तो सध्या आजरा तालुक्यातील मडिलगेत राहण्यासाठी आहे. मुल्ला व नेवडे यांच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची फिर्याद मुलगा रोहितने पोलिसांत दिली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक नीकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी घटनास्थळी भेट दिली.