
कोल्हापूर : भेसळयुक्त मसाल्यांतून आजारांना निमंत्रण
कोल्हापूर: मसाल्यांना वाजवीपेक्षा जास्त भाव, नफा मिळतो म्हणून अनेक जण मसाले विक्रीसाठी पुढे आले. यातून नफेखोरीसाठी भेसळ करून मसाले विक्री करण्याचा ट्रेंड सुरू झाला. कित्येक दुकानदार हळद, जिरे, गरम मसाला, मिरची पावडर आदी मसाले उघड्यावर ठेवून विक्री करतात. मसाल्यांवर थेट धूळ बसते. उघड्यावर ठेवलेल्या मसाल्यांत धुळीचे कण, कार्बनचे कण मिसळतात. धूळ-माती असलेले मसाले जेवणाबरोबर पोटात जातात. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणे गुन्हा आहे; पण कोणी गांभीर्याने पाहत नाही. मात्र, घातक परिणाम लोकांना भोगावे लागतात. यातून कर्करोग, मूत्रपिंड, लकवा, डोळ्यांचे आजार, आतड्यांचे रोग आदींना सामोरे जावे लागते. अशा आजारांची अनेक कारणे असली तरी एक कारण हे भेसळयुक्त अन्नपदार्थ, मसाले खाणे. स्वस्त मिळते म्हणून मसाले घेऊ नयेच; पण मसाले घेताना त्यात भेसळ नाही, याची काळजी घ्या. भेसळ कशी शोधायची?, याची सोपी पद्धती घरीही करून पाहता येते.
अशी शोधा भेसळ
मोहरी : मोहरी दाबून पाहिल्यावर पिवळा पदार्थ निघतो. अर्जेमोनेच्या बिया दाबल्यावर पांढरा पदार्थ निघतो.
दालचिनी : दालचिनी रगडून पाहिल्यावर रंग अति दिसला की भेसळयुक्त असते.
काळी मिरी : काळी मिरी पाणी किंवा मद्यात टाकल्यावर जर वर राहिली तर अशुद्ध, बुडली तर शुद्ध
तिखट : तिखटात पाणी टाकून ठेवा. वरील बाजूला आल्यास शुद्ध, तर खाली बुडाले की भेसळयुक्त
हळद : हळदीत मेटानिल येलो रसायन मिसळतात. हळदीत हाइड्रोक्लोरिक ॲसिड पाण्यात टाकल्यास हळदीचा रंग गुलाबी, जांभळा होतो
कोथिंबीर पावडर : कोथिंबिरीची पावडर
पाण्यात टाकल्यावर अन्य पदार्थ मिश्रित असेल तर तरंगताना दिसेल.
मसाले असे सुरक्षित ठेवा
पाने, साली, फुले, फळांपासून तयार करण्यात येणारे मसाले साफ करणे
सूर्यप्रकाशात किंवा कृत्रिम उष्णतेने वाळविणे, सुकविणे,
प्रतवारी करणे
पदार्थ वाळवून चूर्ण करून ठेवावेत
अर्क, इतर घटक द्रव्ये, द्रवरूप मसाले बाटल्यांत भरून सील करून ठेवावेत
मसाल्याचे पदार्थ नेहमी शुष्क, आरोग्यदृष्ट्या स्वच्छ,
उंदीर- झुरळापासून सुरक्षित ठेवावेत
दळलेले मसाले उघडे ठेवू नयेत, ते डब्यात साठवावेत
धातूच्या डब्यातील पातळ तुकड्यांच्या स्वरूपातील मसाले १२ महिने, कागदी पुठ्ठ्याच्या खोक्यातील मसाले १८ महिने राहतात.
दळलेले मसाले २४ महिने, काचेच्या बाटल्यांतील मसाले
३६ महिने टिकतात.
Web Title: Kolhapur Diseases Through Adulterated Spices
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..