कोल्हापूर : क्षीरसागर-इंगवलेंतील वाद टोकाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Kshirsagar

कोल्हापूर : क्षीरसागर-इंगवलेंतील वाद टोकाला

कोल्हापूर : शिवसेनेच्या शिवाजी पेठेतील कार्यालयाच्या फलकावरील माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे छायाचित्र माजी शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक रविकिरण इंगवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फाडले. याला प्रत्युत्तर देत शहरप्रमुख जयवंत हारुगले यांच्यासह कार्यकर्त्यांनी तो फलक पुन्हा लावला. ‘शिवसेनेच्या फलकांना हात लावाल तर याद राखा,’ असाही इशारा दिल्याचे पत्रक क्षीरसागर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिले.

दरम्यान, क्षीरसागर यांनी गुवाहाटीतून ‘मी सुशिक्षित गुंड आहे,’ असे सांगून ‘एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे, माझ्यासारखा बाहेर पडला तर पळताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही,’ अशी क्लिप ‘व्हायरल’ केली आहे. यामध्ये त्यांनी इंगवले यांचे नाव घेतले नाही. इंगवले यांनीही शिवालय कार्यालयाच्या नावाखाली टेंडर ऑफिस काढल्याची टीका केली आहे.

श्री. क्षीरसागर मंत्री शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने माजी शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांनी शिवाजी पेठेतील कार्यालयाच्या फलकावरील क्षीरसागर यांचे छायाचित्र फाडले. ही माहिती शहरप्रमुख जयवंत हारुगले यांना कळताच त्यांनी काही कार्यकर्त्यांसह पुन्हा तेथे क्षीरसागर यांचे छायाचित्र असलेला फलक लावला. तसेच ‘फलकांना हात लावाल तर याद राखा,’ असाही इशारा दिला.

इंगवले यांच्यासह रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनीही पत्रकाद्वारे क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे. फाडलेला फलक पुन्हा लावण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शहर उपप्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळोखे, कपिल सरनाईक, सनी अतिग्रे, राजू काझी, युवासेनेचे योगेश चौगले, पीयूष चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘जयप्रभा’तून माघार घ्या’

कोल्हापूरची अस्मिता, संस्कृती असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारातून क्षीरसागर यांनी माघार घ्यावी, अशीही मागणी इंगवले यांनी पत्रकाद्वारे केली आहे. तीन महिने आंदोलन करणाऱ्या चित्रपट व्यावसायिकांना न्याय मिळाला नाही तर क्षीरसागर यांना त्यांची जागा त्यांच्या पद्धतीने दाखविण्यात येईल, असाही इशारा इंगवले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.