कोल्हापूर : जिल्ह्याचा ३७५ कोटींचा निधी खर्ची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा नियोजन समिती

कोल्हापूर : जिल्ह्याचा ३७५ कोटींचा निधी खर्ची

कोल्हापूर: जिल्ह्यासाठी असणारा ३७५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च झाला आहे. पर्यटन विकासासाठी २१ कोटी व अल्पसंख्याक कल्याणसाठी ३ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मिळाला. आर्थिक वर्षाच्या अखेरीस आर्थिक गणित जुळवताना कोषागार कार्यालय, जिल्हा नियोजन समिती व बॅंकांमध्ये आज धांदल उडाली. हिशेबाचा ताळमेळ घालत सरकारी कार्यालये रात्री १२ नंतरही सुरु राहिली.

जिल्ह्यात १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षातील सर्व शासकीय आणि बॅंकिंग व्यवहारांचा ताळमेळ घालण्यासाठी सर्वच शासकीय कर्मचारी आणि अधिकारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करत राहिले. शासकीय कोषागार, जिल्हा परिषदेहून अधिक जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात धावपळ पाहायला मिळाली. आर्थिक वर्षातील मंजूर निधी, खर्चिक निधी, अखर्चिक निधी असा सर्व ताळमेळ घालून कोणताही निधी परत जाणार नाही, याची काळजी घेतली. वर्षभरात झालेल्या कामाचा हिशेब मिटवण्यासाठी महिला अधिकारीही सक्षमपणे काम करत राहिल्या.

याशिवाय बॅंका, सहकारी संस्थांसह इतर संस्थांचा सर्व व्यवहार, नफा-तोटा, ताळेबंद व पुढील वर्षातील कामांचे नियोजन या सर्व बाबींचा व्यवहार आज पूर्ण करुन घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी विविध कामांसाठी ३७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा सर्व निधी खर्च झाल्याचे समाधान शासकीय अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर होते. याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन वाढ व्हावी, यासाठी नियोजन केले आहे. यासाठी आवश्‍यक निधी मिळवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आज राज्यातील हिशेब करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय, अल्पसंख्याक विभागासाठी ३ कोटी ५४ लाखांचा निधी मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत आणखी काही निधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवली जात होती.

निधी परत मिळणार

आमदार स्थानिक कार्यक्रमांतर्गत आमदारांना मिळणारा काही विकासनिधी रात्री उशिरा परत जाईल अशी शक्‍यता वर्तवली होती. दरम्यान, हा निधी जरी परत गेला तरी नव्या आर्थिक वर्षात तो परत मिळू शकतो.

Web Title: Kolhapur District Spent 375 Crore Tourism Development

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top