esakal | कोल्हापुरात फिल्मीस्टाईलने मोटारीचा पाठलाग करून दोन किलो गांजा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

०

साहेब मोटार बाजूला घेतो, असे सांगून त्याने रस्त्याच्या बाजूला जाण्याचे नाटक केले आणि संधी साधून तो भरधाव वेगात निघून गेला.

कोल्हापुरात फिल्मीस्टाईलने मोटारीचा पाठलाग करून दोन किलो गांजा जप्त

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर  : फिल्मीस्टाईलने मोटारीचा पाठलाग करून पोलिसांनी शुक्रवारी  दोन किलोग्रॅमचा गांजा पकडला. या प्रकरणी तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. तिघांकडून गांजासह मोटार, तीन मोबाईल संच असा चार लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शहर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने ही कारवाई यशस्वी झाली. 

मोटार चालक सूरज विजय गोडसे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, वाळवा), रितेश राकेश सूर्यगंध (21, रा. ओझर्डे, वाळवा) आणि रोहित लक्ष्मण भोसले (24, रा. रेठरेहरणाक्ष) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गांजाचे कनेक्‍शन इस्लामपूर असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. यामागे रॅकेट असण्याची शक्‍यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कॉन्स्टेबल गुलाब मुल्लाणी (बक्कल नं. 2029) कारवाईचे हीरो ठरले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहर परिसरात सध्या विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिका व पोलिस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील कॉन्स्टेबल गुलाब मुल्लाणी कर्तव्य बजावत होते. त्यांना एका काळ्या आलिशान मोटारीचा संशय आला. येथूनच फिल्मीस्टाईल पाठलाग सुरू झाला. 

गोखले महाविद्यालय चौकातून सायंकाळी काळी आलिशान मोटार सावित्रीबाई फुले रुग्णालय सिग्नलकडे जाताना वाहतूक पोलिस मुल्लाणींना दिसली. मोटारीचा रंग, काळ्या काचा अन्‌ चालकाचा मास्क नाही, हे पाहून मुल्लाणी यांनी मोटार सिग्नलला थांबविली. त्यांनी चालकाकडे मास्क व परवान्याबाबत विचारणा केली. साहेब मोटार बाजूला घेतो, असे सांगून त्याने रस्त्याच्या बाजूला जाण्याचे नाटक केले आणि संधी साधून तो भरधाव मोटार घेऊन टेंबे रोडच्या दिशेने गेला. तसा मुल्लाणी यांचा संशय बळावला. त्यांनी सिग्नलवर असलेल्या मोपेडस्वार तरुणाच्या मागे बसून त्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. घाबरलेला चालक मोटार गल्लीबोळातून हॉर्न वाजवत भरधाव पुढे जात होता. वळण घेताना मोटारीचे मागील दरवाजे उघडत होते. ते मागे बसलेले दोन जण बंद करून घेत होते. अखेरीस ही मोटार मिरजकर तिकटी येथे आली. 

चालकाला पुढे जाण्याचा रस्ता माहीत नसल्याने त्याने मिरजकर तिकटी येथील स्तंभाला दोनदा वळसा घातला. याठिकाणी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रीतम मिठारी, गजानन परिट व रूपेश कुंभार बंदोबस्त बजावत होते. त्यांना पाहून चालकाने मोटार थेट बालगोपाल तालमीच्या दिशेने पुढे नेली. तसे मुल्लाणीसोबत मिठारी, परिट, कुंभार यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. त्याना पाहून चालकाने मोटार भवानी मंडपाच्या दिशेने नेली. तेथे बॅरिकेड्‌स लावल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडला. 


मोटारीची तपासणी... 
मोटारचालकासह आतील दोन तरुणांना पोलिसांनी खाली उतरवले. त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे मागवून वाहनाचीही झडती घेण्यास सुरवात केली. त्यात एका पिशवीत त्यांना गांजाच्या पुड्या मिळून आल्या. पोलिसांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना दिली. चौकशीत चालकाने आपले नाव रोहित गोडसे, तर अन्य दोघांनी रोहित भोसले व रितेश सूर्यगंध असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांना अटक केली. 

गांजा कोठून आणला आणि कोठे नेला जात होता, यासह यामागे रॅकेट आहे का, याबाबतचा खोलवर तपास सुरू केला आहे. 
- प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा 

      घटनाक्रम 

  • गोखले महाविद्यालय चौकात एका मोटारीचा संशय 
  • सिग्नलपाशी रोखल्यानंतर चालकाची नाट्यमय हुलकावणी 
  • एका दुचाकीस्वाराला सोबत घेऊन मुल्लाणींकडून पाठलाग सुरू 
  • टेंबे रोडवरून पुढे गल्लीबोळातून मिरजकर तिकटीपाशी मोटार 
  • तेथील स्तंभाला दोनदा वळसा, त्यामुळे तेथील पोलिसांना संशय 
  • मुल्लाणींसह चार पोलिसांकडून पाठलाग सुरू 
  • बालगोपाल तालमीपासून पुन्हा मोटार भवानी मंडपाच्या दिशेने 

संपादन : विजय वेदपाठक
 

loading image
go to top