

कोल्हापूर : महापालिकेने २०१९ च्या पूररेषेत नदीपात्र ते निळी रेषादरम्यान एकूण २२ मालमत्ता बाधित होत आहेत. तसेच, निळी ते लाल रेषादरम्यान ‘रेडझोन’मध्ये १५९ मालमत्ता आहेत. अशा एकूण १८१ मालमत्ता यापूर्वीच पूररेषेत बाधित झाल्या आहेत. त्यांना पूररेषा निश्चित होण्यापूर्वीच महापालिकेने बांधकाम परवानगी दिल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
२०२१ नंतर झालेल्या महापुरानंतर ३ जूनला प्रसिद्ध झालेल्या नव्या ४० किलोमीटरच्या ‘निळ्या’ आणि ‘लाल’ रेषेत किती मालमत्ता बाधित झाल्या आहेत?, याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिकेने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. यात किती मालमत्ता बाधित होणार? याची धास्ती नागरिकांना आहे.
शहरातील पंचगंगा नदी लगतच्या निळी व लाल पूररेषा दर्शविणारे नकाशे ६ डिसेंबर २०१९ ला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. त्यानुसार दुधाळी-फुलेवाडी-लक्षतीर्थ हे पहिला टप्पा, तर कदमवाडी-मुक्तसैनिक वसाहत-बापट कॅम्प-तावडे हॉटेल-गांधीनगर पर्यंतचा दुसरा टप्पा पूर प्रवण क्षेत्राव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रासाठी अंतिम निळी रेषा नकाशे प्राप्त झाले होते.
६ डिसेंबर २०१९ ची अंतिम निळी व लाल रेषा नकाशाप्रमाणे २००५ च्या पूररेषेत बाधित न होणारी व २०१९ ची रेषा येण्यापूर्वी एकूण २२ बांधकामांना परवानगी दिली होती, अशी बांधकामे स्थगित ठेवली होती. सद्यस्थिती ‘यूडीसीपीआर’ विकास नियंत्रण नियमावलीनुसार ज्या बांधकामांना परवानगी दिली आहे, अशा बांधकामांना नियंत्रण पूररेषेच्या वर ०.४५ मीटर जोता बांधकाम प्रस्तावित करून पुनर्विकासाची परवानगी अनुज्ञेय आहे.
३ जून २०२२ ला पूर्ण शहर व पंचगंगा नदी पात्रालगतच्या गावांसाठी नवीन निळी व लाल नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. निळी, लाल व पिवळी रेषा दर्शविलेली असून, यातील नदीपात्र ते निळी रेषा हा भाग सर्व
प्रकाराचे बांधकामांसाठी निषिद्ध आहे. निळी रेषा ते लाल रेषा हा भाग नियंत्रित पूररेषा मधील असून यात एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार लाल पूररेषेवर ०.४५ मीटर जोता बांधकाम करून विकास परवाना अनुज्ञेय आहे.
सुधारित नकाशांना मंजुरी
शिवाजी पूल ते कदमवाडी या भागातील दोन नकाशांना यापूर्वी मंजुरी दिली होती. आता पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी हे नकाशे सुधारित करून सलग ४०.४० किलोमीटर लांबीतील पूररेषा नकाशांना मंजुरी दिली आहे. संकेतस्थळावर अ.क्र. ८० व ८१ चे नकाशे नव्याने समाविष्ट केले आहेत.
तरतुदीनुसार परवानगी महापालिका
पाटबंधारे विभागाकडून ३ जूनला संकेतस्थळावरून नवीन निळी व लाल रेषा नकाशानुसार नदीपात्र ते निळी रेषा यात येणाऱ्या मिळकतीचा सर्व्हे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही पूररेषा विचारात घेऊन महापालिकेतर्फे यापुढे एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावलीतील तरतुदीनुसार विकास परवानगी देण्याची कार्यवाही करणार असल्याचेही महापालिकेने जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.