Kolhapur : वृद्धाश्रमातील गणेशोत्सवात घरगुती आनंदाचा थाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : वृद्धाश्रमातील गणेशोत्सवात घरगुती आनंदाचा थाट

कोल्हापूर :  ‘फुले घ्या देवा, बाप्पा दुर्वा घ्या’ ...असे म्हणत वयाची ऐंशी ओलांडलेल्या अनुसया सुतार (मावशी) श्री गणपतीची पूजा करतात. गेले वीस वर्षे  वृद्धाश्रमात  राहणाऱ्या मावशी बाप्पाशी  बोलतच त्याला दुर्वा, वस्त्र, फुले अर्पण करतात. अगदी रोजच्या पूजेपासून गणेशोत्सव किंवा होणाऱ्या अन्य उत्सवांत त्या सहभागी असतात. सुमारे ऐंशी वर्षांच्या या मावशी हातातल्या काठीला ‘आपली गाडीच’ मानतात आणि इकडे तिकडे फिरत असतात.  वृद्धाश्रमातील स्वामी समर्थच्या मूर्तीला फेटाही  सुतार मावशी  अत्यंत कलात्मक पद्धतीने बांधतात. चुकून एके दिवशी फेट्याचा पदर निसटला, तर  ‘स्वामी.. ! आज काय माझं चुकलं ?’ म्हणून प्रश्न विचारणाऱ्या सुतार मावशीसह सर्व वृद्ध वृद्धाश्रमात साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांमध्ये अगदी घरातल्याप्रमाणे हौसेने सहभागी होतात. 

चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात घरचे वातावरण अनुभवायला मिळावे यासाठी सर्व उत्सव साजरे केले जातात. येथे २८ महिला आणि १५ पुरुष राहतात. गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सव अशी येथील लोकांची भावना आहे. गणपती वाजत-गाजत आणण्यापासून ते मोरयाचा गजर करत मूर्तीची प्रतिष्ठापना करेपर्यंत गल्लीतील एखाद्या युवक मंडळालाही लाजवेल, असा उत्साह असतो. गौरी आगमनावेळी गल्ली-गल्लीतून युवतींप्रमाणे डोक्यावर गौरीचे कलश येऊन येताना या महिला गौरीचे स्वागत करतात. पंचगंगेवरून आणणे शक्य नसले तरी वृद्धाश्रमातील एका पाण्याच्या नळावरून वाजत-गाजत गौरी आणण्यासाठी महिला नटून सोहळ्यात सहभागी होतात. गौरीचे पूजन, भाजी, अळू वडी, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सत्तरी ओलांडलेल्या या आजीबाईंना इतर वेळी चालणे मुश्कील वाटत असले तरी झिम्मा-फुगडीसाठी फेर धरताना मात्र यांच्या पायात हत्तीचे बळ आलेले असते.

राजापूरचे अरुण लेले उत्साहाने सहभागी होतात. येथील उत्सवात हौस पुरी करून घेतात. वृद्धाश्रमातील सण सांगताना येथील महिलांचा उत्साह ओसंडून वाहतो. गणपती गौरीत गाणी म्हणतो.. झिम्मा फेर धरतो. अगदी घरातल्या उत्सवाप्रमाणे महिला उत्सवात सहभागी असतात. गणपतीच्या अगोदरचे ऋषिपंचमी आणि हरतालिकेचे उपवास आणि व्रतवैकल्येही साजरे होतात.

Web Title: Kolhapur Ganeshotsav Scene Domestic Happiness

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..