
कोल्हापूर : राज्यात झालेल्या सत्तांतराचे पडसाद गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. त्याचाच भाग म्हणून २९ ऑगस्टला होणाऱ्या सभेला माजी संचालकांसह त्यांचे समर्थकही उपस्थित राहाणार आहेत. अलीकडेच या सदंर्भात खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांनी माजी संचालकांची बैठक घेऊन याची रणनीती आखल्याचे समजते.
‘गोकुळ’मध्ये गेल्यावर्षी सत्तांतर झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांचे संघावरील २५ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणताना माजी राज्यमंत्री सतेज पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकहाती सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर या त्या निमित्ताने ‘गोकुळ’च्या कारभारावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यात विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक आघाडीवर आहेत. त्यांना संचालिका अंजना रेडेकर यांनी प्रत्युत्तर दिले; पण आता यात ज्येष्ठ माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनी उडी घेऊन आम्ही विचारणाऱ्या चार प्रश्नांची उत्तरे श्रीमती रेडेकर यांनी द्यावीत, असे आव्हान दिले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांनी विरोधी संचालक व त्यांच्या समर्थकांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यात वर्षभरातील संघाचा कारभार, घटलेले संकलन, कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या झालेल्या बदल्या, दूध दरवाढ या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना कसे घेरता येईल याची रणनीती आखली जात आहे. राज्यसभेतील महाडिक यांचा विजय आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे विरोधकांना विशेष म्हणजे महाडिक गटाला बळ आले आहे. त्या जोरावरच ‘गोकुळ’च्या सभेत विरोधकांना काही प्रश्न विचारण्याची रणनीती आहे.
विशेषतः दूध दरवाढ करताना वाढलेला दर हा ग्राहकांच्या माथी मारून वसूल केला आहे. याच पद्धतीने यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका करणाऱ्या आताच्या सत्ताधाऱ्यांना याचा जाब विचारला जाणार आहे. त्यातच गेली ३० वर्षे ज्यांना पाठिंबा दिला त्या अध्यक्ष विश्वास पाटील यांनीच ऐनवेळी केलेली दगाबाजी महाडिक गटाला जिव्हारी लागली असून सभेत श्री. पाटील यांनाच लक्ष्य करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
या प्रश्नांची सरबत्ती शक्य
दूध दरवाढ करताना ग्राहकांवर टाकलेला बोजा, सात तालुक्यांत अजूनही दूध संकलन रुटचे न झालेले वाटप, टँकर घेताना झालेला गोंधळ, कर्मचारी बदल्या, घटलेले दूध संकलन हे प्रश्न अजेंड्यावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.