Kolhapur Gram panchayat election : गावागावांतील लढती आज होणार स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Gram panchayat election update withdrawal of nomination papers in Gram Panchayat elections

Kolhapur Gram panchayat election : गावागावांतील लढती आज होणार स्पष्ट

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीचा उद्या (ता. ७) एकच दिवस असून, उद्या दुपारनंतर गावागावांतील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. सरपंच आणि सदस्यपदांसाठीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने ज्यांना माघार घ्यायला लावायची आहे, त्यांच्यासाठी नेत्यांचा कस लागेल. अशांच्या माघारीसाठी ‘मनी आणि मसल’सह भविष्यातील राजकारणातील शब्द देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आज अर्ज माघारीचा दिवस असूनही अपवाद वगळता उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाहीत. उद्या दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत असून, त्यानंतर लगेच रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू आहे.

या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होत असून, २० डिसेंबरला मतमोजणी होईल. सरपंचपदाच्या ४७४ जागांसाठी दोन हजार ६६४ उमेदवारांचे, तर सदस्यपदाच्या एक हजार ९५० जागांसाठी तब्बल १६ हजार ३५३ उमेदवारांचे अर्ज काल (ता. ५) झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. अपवाद वगळता बहुतांश गावांत सरपंचपदाच्या एका जागेसाठी दहापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले, अशा गावांतच माघारीसाठी नेत्यांसह गावचे पुढारीपण करणाऱ्यांचा कस लागणार आहे.

केंद्र सरकारचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने आणि या निधी खर्चाचे सर्वाधिकार सरंपचांना असल्याने सरपंचपदासाठी सर्वच गावांत टोकाची इर्ष्या आहे. त्यामुळे सरपंचपदावर आपल्याच गटाचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी आजी-माजी आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून प्रबळ उमेदवाराला रिंगणात ठेवताना इतरांना माघार घ्यायला लावण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे.

बहुरंगी लढतीची शक्यता

लोकनियुक्त सरपंचपदासाठी अनेक गावांत चौरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. मोठ्या गावांत सरपंचपदासाठीच ढिगभर अर्ज राहिले आहेत. त्यामुळे या गावांतच बहुरंगी लढतीची शक्यता आहे. काही गावांत एकाच गटातील तीन-चार उमेदवारांचे अर्ज असल्याने अशा गावांत या निवडी बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला. काही गावांत पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने त्या गावातील संपूर्ण निवडणूकच बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

रात्रभर जोडण्या आणि फोनाफोनी

उद्या (ता. ७) अर्ज माघारीसाठी एकच दिवस आहे. त्यात दुपारी तीनपर्यंतच माघार घेता येणार असल्याने आज रात्री उशिरापर्यंत रिंगणात ठेवायचे कोणाला आणि माघार घ्यायला लावायची कोणाला, यासाठीच्या जोडण्या सुरू होत्या. त्यासाठी नेत्यांचे फोन खणखणत होते.