Kolhapur : सरपंचपदासाठी टोकाची ईर्ष्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat election

Kolhapur : सरपंचपदासाठी टोकाची ईर्ष्या

कोल्हापूर : गावच्या विकासासाठी केंद्राकडून मिळणारा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. परिणामी आपल्याच गटाचा सरपंच होण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत गावातील मोठी भावकी, गठ्ठा मतदान असलेल्यांना महत्त्‍व आले आहे.

दरम्यान, सरपंचपदाच्या ४७४ जागांसाठी तब्बल २६७७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. एका गावात सरपंच पदासाठी १२ ते २० उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक राधानगरी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींत सरपंच पदासाठी ३८६ अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीतील अर्ज माघारीचा ७ डिसेंबर हा शेवटचा दिवस असून, त्याच दिवशी गावागावांतील सरपंच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

केंद्रांकडून थेट ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीच्या खर्चाचे अधिकार सरपंचांना आहेत. त्यामुळे मोठ्या गावांत या पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. याच टप्प्यात जिल्ह्यातील बहुंताश मोठ्या गावांच्या निवडणुका होत असल्याने आजी-माजी आमदारही यात सक्रिय झाले आहेत. काही गावांत हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्या गावांत पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत, तर पूर्वी एकत्र असलेले काही गट या पदावरून एकमेकांविरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे.

सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यासाठी अख्ख्या गावाने या उमेदवाराला मतदान करायचे आहे. मोठ्या गावांत ज्यांची भावकी मोठी त्यांना सरपंच निवडणुकीत महत्त्व आले आहे. विशेषतः मोठ्या गावांत अशा भावकीतीलच उमेदवार देऊन गठ्ठा मतदान मिळवण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यातही भावकीतील उमेदवार देताना गावांतील इतर गट सांभाळताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात निवडणूक

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या-४७४

एकूण प्रभाग संख्या- १६५०

अर्ज माघारीचा शेवटचा दिवस- ७ डिसेंबर

मतदान- १८ डिसेंबर

मतमोजणी- २० डिसेंबर

भविष्यातील शब्द अन्‌

‘अर्थ’पूर्ण चर्चेचा आधार

उद्या (ता.५) उमेदवारी अर्जांची छाननी आणि त्यानंतर अर्ज माघारासाठी दोनच दिवसांचा अवधी मिळणार असल्याने काही गावांत आतापासूनच दुबळ्या उमेदवारांना सरपंचपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी भविष्यातील राजकारणाचा शब्द देण्याबरोबरच ‘अर्थ’पूर्ण चर्चेचाही आधार घेतला आहे.

विधानसभेची पेरणी

ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम समजली जाते. या निवडणुकीनंतर पुढच्या वर्षी डिसेंबरमध्येच उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत आपल्याच गटाचा सरपंच आणि सदस्यही निवडून आणण्यासाठी आजी-माजी आमदारांत मोठी रस्सीखेच सुरू होणार आहे.

सरपंचपदासाठी तालुकानिहाय आलेले अर्ज

शाहूवाडी

ग्रामपंचायती-४९

आलेले अर्ज- २०४

करवीर

ग्रामपंचायती-५३

आलेले अर्ज-३७४

गगनबावडा

ग्रामपंचायती-२१

आलेले अर्ज-८१

राधानगरी

ग्रामपंचायती-६६

आलेले अर्ज-३८५

भुदरगड

ग्रामपंचायती-४३

आलेले अर्ज-२४९

आजरा

ग्रामपंचायती-३६

आलेले अर्ज-१६९

पन्हाळा

ग्रामपंचायती -५०

आलेले अर्ज -२६०

हातकणंगले

ग्रामपंचायती-३९

आलेले अर्ज-३०३

शिरोळ

ग्रामपंचायती-१७

आलेले अर्ज-१२२

कागल

ग्रामपंचायती-२६

आलेले अर्ज-१६९

गडहिंग्लज

ग्रामपंचायती-३४

आलेले अर्ज-१९१

चंदगड

ग्रामपंचायती-४०

आलेले अर्ज-१७०

एकूण

ग्रामपंचायती-४७४

आलेले अर्ज-२६७७