कोल्हापूर : मनपाच्या यादीत ग्रामपंचायतीतील मतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur municipal corporation

कोल्हापूर : मनपाच्या यादीत ग्रामपंचायतीतील मतदार

कोल्हापूर : शहरातील एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागातील यादीत मतदार गेल्याच्या घटना समोर येत असताना आज चक्क ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांची नावे लगतच्या शहरातील प्रभागात आल्याचे आढळले. शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ४६५ मतदार फुलेवाडीतील प्रभागात आल्याचे माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे मतदार यादीचा घोळ वाढतच चालला असल्याचे दिसून येत आहे.

एका प्रभागातील मतदार नजीकच्या प्रभागात गेले आहेत. शिवाय काही ठिकाणची नावे नजीकच्या नव्हे, भौगोलिक संलग्नता नसलेल्या प्रभागातही गेल्याच्या तक्रारीही काल काही माजी नगरसेवकांनी बैठकीत केल्या होत्या. त्यानंतर आज वेगळाच प्रकार दिसून आला. सुनील कदम व सत्यजित कदम यांनी आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली.

यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर उपस्थित होते. यावेळी कदम यांनी शिंगणापूरच्या ग्रामीण हद्दीतील मतदारांची नावे नजीकच्या फुलेवाडीतील प्रभागात आली असून, याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

प्रत्यक्ष मतदार तपासण्याच्या सूचना

विविध पक्षांकडून घेतल्या जात असलेल्या हरकतींमुळे आज उपायुक्त आडसूळ यांनी सहायक आयुक्त, उपशहर अभियंता, सर्व्हेअर, कनिष्ठ अभियंता यांची बैठक घेतली. त्यामध्ये आलेली हरकत मतदाराच्या नावासह प्रत्यक्ष जाऊन तपासा, पंचनामा व जिओ टॅग सादर करा, कोणतीही हरकत स्वीकारा, अशा सूचना आडसूळ यांनी केल्या.

कोल्हापूर ः महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली मुदत दोन दिवसांनी वाढवली आहे. आता ३ जुलैपर्यंत हरकती देता येणार आहेत. राज्यातील अन्य १३ महापालिकांसाठीही हाच निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज ३५ हरकती दाखल झाल्या आहेत.

१ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत ३ जुलैपर्यंत वाढविली आहे. रविवार व शनिवारच्या सुटीच्या दिवशीही आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू व्होटर मोबाईल ॲपद्वारेही हरकती व सूचना दाखल करता येतील. ॲपवरील व्होटर लिस्ट सर्च यावर क्लिक केल्यावर नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी व्होटर लिस्ट ऑब्जेक्शनवर क्लिक करून व्होटर लिस्ट इलेक्शन प्रोग्राम २०२२ निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल. मुदतवाढ दिली असली, तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलैला प्रसिद्ध करण्यात येतील. महापालिकेकडे आज ३५ हरकती दाखल झाल्या असून, आतापर्यंत ४८ हरकती आल्या आहेत.

बुधवारी आलेल्या हरकती (कंसात एकूण)

विभागीय कार्यालय एक- २२ (२९)

विभागीय कार्यालय दोन- ४ (८)

विभागीय कार्यालय तीन- ६ (८)

विभागीय कार्यालय चार- ३ (३)

Web Title: Kolhapur Gram Panchayat Voters In The Corporations List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..