कोल्हापूर : वादळी पावसाचा दणका

शहरात धुळीचे लोट अनेक ठिकाणी वीज खंडित
वादळी पावसाचा दणका
वादळी पावसाचा दणकाsakal

कोल्हापूर : जोरदार वारा, गारांचा मारा आणि विजांच्या कडकडाटाने कोल्हापूर शहर व परिसराला वादळी पावसाने आज सायंकाळी झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे शहरावर धुळीची चादर पसरली, तर १५ ते २० मोठी झाडे कोसळली. यापैकी काही झाडे वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे फुलेवाडीपासून कुडित्रेपर्यंत, तर निम्या शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर एका चारचाकी वाहनावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यात एकच धावपळ उडाली. दरम्यान, सांगलीसह मिरज, वाळवा, शिराळा तालुक्यातही पावसाने झोडपले. बेळगाव शहर परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उष्मा जाणवत होता. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. यातच पारा सुमारे ३७ ते ३९ डिग्रीपर्यंत राहिला. दरम्यान, सायंकाळी साडेपाचला पश्‍चिमकडून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. मार्केट यार्ड, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहतीकडून रंकाळ्याकडे जोरदार वारे वाहत होते. याच परिसरात घरावरील व शेडवरील पत्रे उडून गेले.

पावसाआधी शहरावर धुळीची चादर पसरली. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या हातगाड्या आपोआपच रस्ता सोडून बाजूने जात होत्या. मोठमोठे फलक तुटून आणि फाटून निघाले. त्यानंतर अर्धा तासाने जोरदार गारांसह पावसाने हजेरी लावली आणि शहरातील लोकांसह छोट्या-मोठ्या उद्योजकांची तारांबळ उडाली. कसबा बावडा येथील रणदिवे गल्ली पूर्व येथील मैदानाजवळील नागोबा मंदिरशेजारील वडाचे झाड कोसळून एक दुचाकी व चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे पाऊण तासानंतर वाऱ्यासह पावसाचा जोर कमी झाला.

झाडे कटरच्या सहाय्याने दूर

ताराबाई पार्क, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, रूईकर कॉलनी, राजोपाध्येनगर, शिवाजी पार्क येथे रस्त्यावर झाडे पडली. तेथे जीवित वा वित्त हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले; पण सायंकाळी सहाच्या दरम्यान झाडे पडल्याच्या येत असलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाची वाहने तिथे पोहचत होती. तेथील झाडे कटरच्या सहाय्याने दूर करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

भाजी मंडईची दैना

जोरदार वाऱ्यामुळे शहरातील कपिलतीर्थ, पाडळकर मार्केट, पाच बंगला, रेल्वेस्थानकजवळील भाजी बाजाराची दैना उडाली. वाऱ्यामुळे पालेभाज्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. एकीकडे वारे आणि दुसरीकडे गारांचा पाऊस यामुळे ग्राहकांनीही मार्केट सोडून सुरक्षितस्थळी आसरा शोधला.

येथे कोसळली झाडे

कसबा बावडा येथे एक दुचाकी आणि चारचाकीचे झाड कोसळून नुकसान

रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर मोटारीवर झाड कोसळून वाहतूक ठप्प

मुक्तसैनिक वसाहत, कदमवाडी, सानेगुरुजी वसाहत येथे प्रत्येकी एक, तर शाहू मिलमध्ये दोन झाडे कोसळली

केर्ली रस्त्यावर दोन झाडे कोसळून वाहतूक खोळंबली

घोडावत शिक्षण संस्थेजवळ एक झाड कोसळले

वीजपुरवठा पूर्ववत होण्यास अवधी लागणार

पाडळी खुर्द, बालिंगा, शिंगणापूर, हणमंतवाडी, वाकरे ते कुडित्रेपर्यंत

मुक्तसैनिक वसाहत, उद्यमनगर, कसबा बावडा, शिये, शिरोली, नागाव परिसर

गंगावेश, रंकाळवेश, सानेगुरुजी वसाहत परिसरात काही काळ

वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार; काही ठिकाणी शुक्रवारी दुपारपर्यंत शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com