कोल्हापूर : ५० हजार हेक्‍टर पेरण्या खोळंबल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेरणी

कोल्हापूर : ५० हजार हेक्‍टर पेरण्या खोळंबल्या

कुडित्रे : यंदा १०४ टक्के मान्सून आहे, असा हवामान खात्याचा अंदाज होता. यामुळे शेतकऱ्यांनीही खरिपासाठी जोरदार तयारी केली होती. मात्र, जून कोरडाच गेला. यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या सुमारे ५० हजार हेक्‍टर पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख चार हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी फक्त ४६ टक्के पेरणी झाली. ९४ हजार ६१८ हेक्टर पेरणी झाली आहे. याच कालावधीत गतवर्षी एक लाख ४५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० हजार हेक्‍टर पेरणी झालेल्या नाहीत. यामुळे यंदा खरिपात शेतकऱ्यांचे नुकसान होईल असे चित्र आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार अकरा दिवसात फक्त शंभर मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. यात पाऊस चांगला झालेल्या गडिंग्लज तालुक्यात ७७ टक्के, कागल ६८, पन्हाळा ५७, गगनबावडा ५४ टक्के पेरण्या झाल्या आहेत, उर्वरित तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा खाली पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात नाचणीच्या १८ हजार हेक्‍टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त पंधराशे २५ हेक्टर पेरणी झाली आहे. उसाच्या भरण्या झाल्या आहेत, पेरलेले भात अद्याप एका काडीवर दोन पानावरच आहे, पाऊस कमी झाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली आहे.

जिल्ह्यात गतवर्षी आजच्या दिवशी सरासरी तब्बल १०० मिलिमीटर पाऊस झाला होता, यावर्षी तो केवळ ७.२ मिलिमीटर झाला. अशीच स्थिती धरणक्षेत्रात आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाऊस रुसला असल्याचे दिसून येते. गतवर्षी जूनमध्ये झालेल्या पावसाने हाहाकार उडाला होता. यंदा मात्र त्याच्याकडे डोळे लागले आहेत.

जिल्ह्यातील एकूण सर्व धरण क्षेत्रात गतवर्षी १ जून ते २८ जूनपर्यंत तब्बल ८९९ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. आजपर्यंत २४७ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात ३३ टक्केच पावसाची नोंद झाली, तर गतवर्षी हे प्रमाण ४१ टक्के होते. गतवर्षी ४३.९० टीएमसी, तर आज २६.७९ टीएमसी पाणीसाठा जिल्ह्यातील सर्व धरणांत आहे. जिल्ह्यात एकूण प्रमुख चार धरणे, तर दहा मध्यम प्रकल्प आहेत.

गतवर्षी पंचगंगा नदी खोऱ्यातील धरणात सरासरी ७.२७ टीएमसी पाऊस झाला होता. त्याचे टक्केवारीतील प्रमाण ४१ टक्के होते. यावर्षी त्याची सरासरी ५.६८ टीएमसी पाऊस झाला असून, ३३ टक्के प्रमाण आहे.

Web Title: Kolhapur Hectares Were Sown Rained In The District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..