बाल आरोग्य तंदुरुस्तीचे आव्हान | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. शिशिर मिरगुंडे

कोल्हापूर : बाल आरोग्य तंदुरुस्तीचे आव्हान

कोल्हापूर : कोरोना संकट आले, लॉकडाउन सुरू झाला त्यात दीड-दोन वर्षे मुले घरीच होती. याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. २० टक्के बालकांना स्थुलता वाढली, मानसिक, शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या तंदुरुस्त करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी शिक्षक, पालकांनी मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यांची लक्षणे ओळखून आरोग्य उपक्रम राबवावे लागणार आहेत, असे मत बालरोगतज्‍ज्ञ डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी व्यक्त केले.

बाल दिनानिमित्त कोरोनानंतर बालकांचे आरोग्य शालेय शिक्षण याविषयी डॉ. मिरगुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘दीड- दोन वर्षाच्या कालावधीत अपवाद वगळता बहुतांशी शाळा बंद होत्या. शिक्षण ऑनलाईन सुरू होते. त्यामुळे मुलांचा मोबाईल स्क्रीनटाईम वाढला. मुलांच्या हालचाली मर्यादित झाल्या. या एका जागी, एकाच घरात मुले बंदिस्त झाली. कालांतराने या बंदिस्तपणाची त्यांना सवय लागून गेली. यात हालचाली बंद झाल्या, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. यातच फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढले. यातून अनेक मुलांचा लठ्ठपणा वाढला.

हेही वाचा: विधानसभेच्या विजयासाठी ‘मोदी व्हिजन’

पोट विकार सुरू झाले. अनेकांची रोग प्रतिकारक क्षमता खालवल्याने नियमित आजारांची लक्षणे दिसणाऱ्या मुलांची संख्या वाढती आहे.’’

ते म्हणाले, ‘‘मुलांचे खेळ बंद झाले, मोबाईल पाहणे सुरू झाले. अनेकांचा मित्रांशी संवाद तुटला, एकटेपणा वाढला, यातून मुलांची निराशा वाढली. मुलांची चिडचिड वाढली. अशी लक्षणेही दिसत आहेत. वरील सर्व बदल हे विपरीत असले तरी ते दुरुस्त होणारे आहेत. त्यामुलांची लक्षणे ओळखून तज्‍ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे आहे. मुलांना व्यायामाची सवय लावणे, खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित करणे, स्वच्छता राखणे, संवाद, आनंदी असणे यासाठी उपक्रम राबवण्याची गरज आहे.’’

लसीकरण करून घ्यावे

कोरोना संपला असे सरसकट समजून मुलांनी बेशिस्त अगदीच खुले वागून चालणार नाही तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे प्रत्येक मुलाच्या व्यक्तिगत काळजीचा भाग म्हणून महत्त्‍वाचे आहे. बालकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तयारी सुरू आहे. अशी लस आल्यास मुलांनी लसीकरण करून घ्यावे, त्यासाठी शालेय स्तरावर मुलांत व पालकात जागृकता वाढवणे अपेक्षित आहे, असेही डॉ. मिरगुंडे यांनी सांगितले.

loading image
go to top