कोल्‍हापूर : आंतरजातीय विवाहाचे वाढले प्रमाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inter-Caste Marriage

कोल्‍हापूर : आंतरजातीय विवाहाचे वाढले प्रमाण

कोल्‍हापूर : समाजातील अस्‍पृश्यता कमी करण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्‍न करीत आहे. याचाच एक भाग म्‍हणून आंतरजातीय विवाहाला प्रोत्‍साहन देण्याचे धोरण १९५८ मध्ये घेण्यात आले. यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना भेटवस्‍तू व रोख रक्‍कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला पाच भांडी व ३०० रुपये रोख रक्‍कम देण्यास सुरुवात झाली. यात मागील ६४ वर्षांत वेळोवेळी बदल केले असून, सध्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संसार थाटण्यासाठी ५० हजार रुपयांची मदत करण्यात येते. आता यातही बदल झाला असून, अशा जोडप्यास शासनाकडून ५० हजार, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनकडून दोन लाख ५० हजार असे तीन लाख रुपये अर्थसहाय्‍य देण्यात येते. मात्र, याचे उदाहरण अद्याप तरी उपलब्‍ध नाही.

भारतीय राज्यघटनेने कोणी जातीयता पाळत असेल तर त्याला शिक्षा देण्याचीही तरतूद केली आहे. असे असले तरी समाजात आजही जातीयता पाळली जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, त्याने खचून न जाता शासन अस्‍पृश्यता निवारण करण्यासाठी विविध कायदे, अभियान, उपक्रम राबवत असते. एका बाजूला कायद्याचा धाक ठेवत असतानाच अस्‍पृश्यता निवारणाच्या कामास प्रोत्‍साहन देण्याचाही प्रयत्‍न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्‍हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्‍य देण्यात येते. वेळोवेळी अर्थसहाय्‍याची रक्‍कम वाढवून अशा नवविवाहित जोडप्यांना संसार करताना काही अडचणी येणार नाहीत, यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. शासनाची ही योजना तळागाळात पोचल्याची अनेक उदाहरणे आहेत.

दरवर्षी शेकडोंच्या संख्येने या योजनेतील सहभाग वाढत आहे. पूर्वी असा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय जोडपी पुढे येत नसत. मात्र, सतत प्रबोधन, कायद्याचे पाठबळ यामुळे आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. विभागाकडे अर्ज येत असले तरी अजूनही काही जोडपी या योजनेचा लाभ घेत नाहीत. अशा सर्व जोडप्यांना लाभ देण्यासाठी समाजकल्याण विभाग प्रयत्‍न करीत आहे.

- दीपक घाटे, जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी

योजनेचा थोडक्यात प्रवास सुरुवात- १९५८

सुरुवातीला- ३०० रुपये व पाच भांडी भेट

१९८०- दोन हजार सहाय्‍य व ५०० स्‍वागत समारंभासाठी

१९८५- पाच हजार सहाय्‍य व ५०० स्‍वागत समारंभासाठी

१९९६- १५ हजार अर्थसहाय्‍य

२०१०- ५० हजार सहाय्‍य

२०२२- ५० हजार शासन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनकडून दोन लाख ५० हजार

कुणासाठी योजना?

मुलगा अनुसूचित जातीचा व मुलगी सवर्ण हिंदू असेल तर व जर मुलगा सवर्ण हिंदू असेल व मुलगी अनुसूचित जातीची असेल तर असा विवाह आंतरजातीय विवाह म्‍हणून ओळखला जातो. २००४ मध्ये मागासवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त जाती, भटक्या जमाती यातील आंतर प्रवर्गातील आंतरजातीय विवाहितांनाही ही योजना लागू करण्यात आली.

Web Title: Kolhapur Inter Caste Marriages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top