
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्यावर आज सकाळी एका बंदीने पत्र्याच्या तुकड्याने हल्ला केला. राऊंडच्या वेळी हा प्रकार घडला. यामध्ये इंदूरकर यांच्या हाताला दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कारागृहात तारांबळ उडाली.
याबाबत अधीक्षक इंदूरकर यांनी दिलेली माहिती अशी, की कळंबा मध्यवर्ती कारागृहात रत्नागिरीहून संशयित बंदी २५ सप्टेंबर २०२१ ला प्रशासकीय कारणास्तव दाखल झाला. त्याच्याकडे वॉचमनचे काम होते. दरम्यान कारागृहात नवीन दाखल झालेल्या एका बंदीच्या पायावर व अंगावर पाय टाकल्याच्या कारणावरून संशयित बंदीवर कारवाई करण्यात आली होती. याचा राग त्याच्या मनात होता.
अधीक्षक इंदूरकर हे आज सकाळी कारागृहाची तपासणी करत होते. यावेळी संबधित बंदीने पत्र्याच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच रोखला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच बाजूला केले. मात्र या हल्ल्यात इंदूरकर यांच्या हाताला दुखापत झाली. यासंबधी संशयित बंदीवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे इंदूरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.