esakal | Kolhapur | संगीतसूर्य पुरस्कार तत्‍काळ सुरू करा
sakal

बोलून बातमी शोधा

कृती समितीतर्फे प्रशासकांना निवेदन

कोल्हापूर : संगीतसूर्य पुरस्कार तत्‍काळ सुरू करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने तरी त्यांच्या नावाने रखडलेला पुरस्कार तत्काळ सुरू करावा. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला समजावी, यासाठी नाट्यगृह परिसरात व्यक्तीशिल्प उभारावे. त्यासाठी आवश्यक निधीसाठी आम्ही प्रयत्न करू, अशा मागणीचे निवेदन शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. लवकरात लवकर याबाबतची कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, याबाबत चार ऑक्टोबरला ‘सकाळ’ने ‘संगीतसूर्य पुरस्काराला समितीचे ग्रहण अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी वयाच्या चौथ्या वर्षांपासून रंगमंचावर प्रवेश केला. अवघे ३२ वर्षे आयुष्य लाभलेल्या भोसले यांनी संपूर्ण भारतात स्वत:ची रेल्वे असणारी ‘ललीतकलादर्श’ ही नाटक कंपनी काढली. त्या माध्यमातून त्यांनी ३१ नाटके आणि स्वत: ५१ भूमिका अजरामर केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या पॅलेस थिएटरचे उद्‌घाटन त्यांच्या ‘संगीत सौभद्र’ नाटकाने झाले होते.

हेही वाचा: चांगभलंच्या जयघोषात जोतिबाचा उद्या होणार पहिला पालखी सोहळा

या प्रयोगातून मिळालेली रक्कम त्यांनी येथील लोकोपयोगी कामासाठी वापरली होती. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी महापालिकेने १३ वर्षांपूर्वी पुरस्काराची घोषणा करून पन्नास हजार रकमेचीही तरतूद केली. पण, अजूनही हा पुरस्कार सुरू झालेला नाही. त्याशिवाय नाट्यगृह परिसरात पुतळा शक्य नसल्यास त्यांचे व्यक्तीशिल्प उभारावे, अशी कलाकार, कलाप्रेमींची मागणी असून, याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात केशवराव भोसले यांचे नातू राजशेखर भोसले, शाहीर रंगराव पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे, विलास भोगाळे, रमाकांत आंगरे, चंद्रकांत सूर्यवंशी, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील आदींचा समावेश होता.

loading image
go to top