
कोल्हापूर : महिन्याला पन्नास ते साठ हजार किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळालेच पाहिजेत, या हेतूने गोर-गरीब आणि गरजूंना महिना दहा टक्के व्याज दराने पैसे द्यायचे. त्यानंतर एक-दोन हप्ते वेळेत भरणाऱ्या त्या कर्जदाराला अचानक आर्थिक अडचण येते आणि तेथूनच मन बाजूला ठेवून ‘मनगटा’च्या जोरावर गरिबांची पिळवणूक करण्याचे काम शहर परिसरातील गावागावांत दिसून येत आहे. याला काही राजकीय पाठबळही कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे.
करवीर तालुक्यातील एक गाव कुस्ती, शर्यती आणि मोठ्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. येथील काही तरुण केवळ आपल्याच गावातील नव्हे तर आजूबाजूच्या गावातील काही तरुणांना खासगी सावकारीतून रक्कम देत आहेत. या गावातील एकाची सावकारांचा सावकार म्हणून पोस्टर्सही लावली होती. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता नव्याने याला खतपाणी घातले जात आहे. याच पावलावर पाऊल टाकत काही चांगले आणि बेरोजगार तरुणही सावकारीच्या मागे धावत आहेत.
घरच्यांनाही त्याच्या कामाबद्दल तसूभरही माहिती नाही. त्याचा थाट-माट, मोठ्याने घातलेला वाढदिवस कोण करते आणि कसा झाला हे विचारण्याचे धाडस कुटुंबीयांनी करायला हवे, अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर शहर परिसरातील पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावात तर आठ-दहा तरुण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सावकारीत गुंतून आहेत. ज्याला पैसे हवेत, त्याच्याकडून पैसे घेतल्याचा स्टॅंम्प किंवा एखाद्या व्यक्तीला मध्यस्ती घालून रक्कम दिली जाते. ही रक्कम देताना प्रतिमहिना दहा टक्के व्याज द्यावे लागते. एखादा हप्ता थकीत राहिला तर त्याचे चक्रवाढ व्याज लागू केले जाते. त्याची परतफेड झाली नसेल तर हेच तरुण आपल्या बलदंड शरीरयष्टीच्या जोरावर संबंधित कर्जदाराची दुचाकी किंवा त्याच्या घरच्या लोकांकडून दागिने जबदस्तीने काढून आणत आहेत.
तत्काळ आणि ताजा पैसा मिळत असल्याने काही लोकांनी सावकारीचे संघटनच केले आहे. हे लोक एकमेकांना सामील आहेत. जे बेकायदेशीरपणे सावकारी करत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. तालीम, व्यायामशाळेत जाऊन तयार केलेली पिळदार शरीरयष्टी, चार लोकांमध्ये उठबस, एखाद्या संघटना किंवा पक्षाचे छोटे-मोठे पद घेतलेला, आमदार- खासदार किंवा एखाद्या मंत्र्याला आयकॉन मानून मिरवणारे तरुण आता गावागावांतील सावकारीसह इतर अवैध कामात सक्रिय झाले आहेत. ज्यांनी तालमींच्या माध्यमातून किंवा शरीरसौष्ठवमधून मैदाने गाजवून स्वत:चा व गावचे नाव पंचक्रोशीत झळाळीला आणेल. तेच काही तरुण आता अवैध कामात समाधान मानत आहेत.... यावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका.
जिल्ह्यात अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधवा किंवा तक्रार करावी.
- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.