Kolhapur : स्थानिक जवारी मिरचीचा वाढला ठसका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 लाल मिरची.

Kolhapur : स्थानिक जवारी मिरचीचा वाढला ठसका

गडहिंग्लज : अवकाळी पावसाने कर्नाटकी जवारी (संकेश्‍वरी चवाळी) मिरचीच्या घटलेल्या आवकेमुळे स्थानिक जवारीच्या दराचा ठसका वाढला आहे. गेल्या डिसेंबरमध्येच या मिरचीने ८०० वरून १६१० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारली आहे. परिणामी या जवारी तथा संकेश्‍वरी मिरचीला यंदाही अच्छे दिन आले आहेत.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी १५ ऑक्टोबरनंतर मिरचीची आवक सुरू होते. यावर्षी समितीत पहिला सौदा २६ ऑक्टोबरला झाला. आठवड्यातून बुधवार व शनिवारी मिरचीचे सौदे होतात. सुरुवातीचा महिनाभर आठवड्याला ४० ते ५० पोत्यांचीच आवक होत होती. अवकाळी पावसाने मार खाल्लेल्या मिरचीचे प्रमाण या आवकेत अधिक होते. पावसामुळे डागी आणि पांढऱ्या‍ झालेल्या मिरचीला दरही कमी मिळाला. डिसेंबरमधील तोडीने जवारीच्या उत्पादकांना चांगला दिलासा मिळाला. या महिन्यातील आवकेला दर्जानुसार ८०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दराची सुरुवात झाली.

हळूहळू दराचा आलेख वाढत जात कालच्या (शनिवार) सौद्याला तो १६०० रुपये प्रति किलोवर थांबला आहे. या वर्षीच्या दराचा उच्चांक प्रति किलो १६१० रुपयांचा आहे. हा दर बुधवारी (ता. २८) मिळाला. सुळे, बसर्गेतील उत्पादकांच्या मिरचीला हा दर मिळाला. अवकाळी पावसामुळे कर्नाटकातील नेर्ली, हत्तरवाट, संकेश्‍वर, बिद्रोळी आदी भागांतील जवारी मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील एक टक्काही मिरची या वर्षी येथील सौद्याला आलेली नाही.

स्थानिक जवारी मिरचीचे उत्पादनही अवकाळी पावसाने ४० ते ५० टक्के घटले आहे. या दोन्हीचा परिणाम दर वाढीवर झाला आहे. दरवर्षी कर्नाटक आणि स्थानिक जवारीच्या आवकेमुळे सुरुवातीचा महिना-दीड महिना कमी दर मिळायचा. जानेवारीत आवक कमी झाल्यानंतर या मिरचीच्या दराचा भडका उडायचा, परंतु यंदा चांगल्या गुणवत्तेच्या जवारी मिरचीच्या दराने सुरुवातीपासूनच उसळी घेतली आहे.

मिरचीची सरासरी आवकही घटली

दरवर्षी सरासरी डिसेंबरअखेर साडेतीन ते चार हजार दरम्यान मिरची पोत्यांची आवक नोंदली जायची. या वर्षी मात्र २७१८ पोत्यांचीच आवक झाली आहे. यामध्ये जवारी मिरचीच्या १६०० ते १७०० पोत्यांचा समावेश आहे. जानेवारीत जवारी मिरचीचा अंतिम टप्पा सुरू होतो. यामुळे मिरचीचे दर आणखी भडकण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी वर्तवली. ब्याडगी मिरचीची आवक सुरू झाली आहे. रॅलीश, पायसी, खोडवा मिरचीही येत आहे. दरम्यान, संक्रांतीनंतर सर्व जातीच्या मिरच्या येथील बाजारात दाखल होतील. तेव्हापासूनच घरगुती मिरची खरेदीला प्रारंभ होतो.